प्रहार अपंग क्रांती संस्थेची मनपा आयुक्तांकडे मागणी
निकष डावलल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासनाने 28 फेब्रुवारी 2012 रोजी जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकानुसारच महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात यावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासन निर्णयानुसार महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्या-त्या शहरातील क्रीडा, शिक्षण, उद्योग, पत्रकारिता, न्यायपालिका, विधी तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्र, संस्कृती, इतिहास, साहित्य तसेच समाजसेवा या विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींची नियुक्ती करणे अपेक्षित आहे. अशा तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींच्या सहभागामुळे शहराच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकते आणि नागरिकांच्या मूलभूत समस्या प्रभावीपणे सोडविण्यास मदत होऊ शकते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
स्वीकृत नगरसेवक ही संकल्पना राजकीय पक्षांनी वाटून दिलेल्या “रेवड्या किंवा खिरापत” म्हणून वापरणे चुकीचे असून, याबाबत शासनाने स्पष्ट नियम व निकष ठरवून दिलेले आहेत. या नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक आणि बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या निकषांकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय दबावाखाली स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जात असल्याचा आरोपही प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष ॲड. लक्ष्मण पोकळे यांनी स्वतः औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली असून, ही याचिका सध्या मा. न्यायालयात प्रलंबित आहे. या विषयावर न्यायालयीन लढा सुरू असून शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संस्थेचा पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती न करता केवळ राजकीय दबावाखाली निवड करण्यात आल्यास, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयीन कारवाई करण्यास आम्ही बाध्य राहू, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीनेच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
