महिलांनी आत्मनिर्भर होऊन आरोग्याची जबाबदारी घ्यावी -सरोजिनी पगडाल
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या पारंपरिक हळदी-कुंकू समारंभात महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, महिलांचे सक्षमीकरण आणि आरोग्यविषयक जनजागृती या त्रिसूत्रीवर आधारित हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर येथील नवनिर्वाचित नगरसेविका सरोजिनी पगडाल या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नलिनी गीते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नगरसेविका सरोजिनी पगडाल म्हणाल्या की, “आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहे. मात्र या धावपळीत महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आत्मनिर्भरतेसोबतच स्वतःसाठी जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मानसिक, शारीरिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम महिला घडली, तर कुटुंब आणि समाजही सक्षम होतो.” महिलांनी आपली ओळख केवळ कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता समाजातही ठसा उमटवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डॉ. नलिनी गीते म्हणाल्या की, “आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आज मोतीबिंदू शस्त्रक्रिया अत्यंत सोपी, सुरक्षित व अल्पकालीन झाली आहे. तरीही अनेक महिला वेळेवर तपासणी करत नाहीत. प्रत्येक महिलेने चाळीशी ओलांडल्यानंतर नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.” यासोबतच त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व स्पष्ट करत समाजात याबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
यावेळी कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला वकिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानित महिला वकिलांमध्ये ॲड. पूनम वडेपेल्ली, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. लक्ष्मी छाया रामदिन, ॲड. लक्ष्मी लखापती, ॲड. गौरी सामलेटी, ॲड. स्विटी कोडम, ॲड. वर्षा सुरकुटला, ॲड. प्रतीक्षा मंगलारप यांचा समावेश होता.
पद्मशाली स्नेहिता संघमच्या अध्यक्षा डॉ. रत्ना बल्लाळ यांनी प्रास्ताविकातून संघमच्या उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय सपना छिंदम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना कोळपेक यांनी तर आरती छिंदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूनम वन्नम, रेखा वडेपेल्ली, सविता एकल्लदेवी यांनी सहकार्य केले. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ पारंपरिक पद्धतीने, आनंदी व उत्साही वातावरणात रंगला होता.
