पारंपरिक नववधूंच्या वेशभूषेत युवतींचा रॅम्प वॉक
महिलांना मेकअपचे प्रात्यक्षिक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात सुरु असलेल्या सावित्री ज्योती महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ब्युटी टॅलेंट शोने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या शोमध्ये युवतींनी नृत्य, रॅम्प वॉकसह विविध कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विशेषतः पारंपरिक नववधूंच्या विविध वेशभूषेत सजलेल्या युवतींनी रॅम्प वॉक करत उपस्थितांची मने जिंकली.
सावेडी येथील गुलमोहर रोडवरील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडलेल्या या ब्युटी टॅलेंट शोमध्ये जिल्ह्यातील मेकअप आर्टिस्ट, महिला तसेच युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताहाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून युवतींमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आयोजकांनी स्पष्ट केला.
ब्युटी टॅलेंट शोचे उद्घाटन मंगलाताई भुजबळ, सौंदर्य तज्ज्ञ विद्याताई सोनवणे व वैद्य नरेंद्र विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मेकअप आर्टिस्ट विद्याताई सोनवणे यांनी अद्यावत मेकअप तंत्रज्ञान, सौंदर्यप्रसाधनांचा योग्य वापर तसेच बदलत्या फॅशननुसार मेकअप कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित महिला व युवतींना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मेकअपचे विविध बारकावे समजावून सांगण्यात आले. यावेळी ॲड. गायत्री गुंड, दिपाली उदमले, हेमलता कांबळे, रजनी ताठे, प्रियंका नगरकर, ॲड. आरती शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे आदी मान्यवरांसह बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या ब्युटी टॅलेंट शोमध्ये सहभागी मेकअप आर्टिस्टांनी आपल्या मॉडेल्सना विविध पारंपरिक वेशभूषेत सजविले होते. युवतींनी रॅम्प वॉक करत नृत्य, व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाद्वारे आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. पाहुण्यांचे स्वागत संमेलनाचे संयोजक ॲड. महेश शिंदे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण सौंदर्य तज्ज्ञ विद्याताई सोनवणे यांनी केले. स्पर्धेत उत्कृष्ट ब्युटीशियन म्हणून प्रथम क्रमांक- ज्योती खांदवे, द्वितीय- सोनाली पगारे, तृतीय- दीपा सरोदे यांनी पटकाविला. उत्तेजनार्थ रेणुका गाडे व सारिका कोकाटे यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
