• Mon. Jan 26th, 2026

जनकल्याण संस्थेच्या वतीने रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांची जागृती उपक्रमास प्रारंभ

ByMirror

Jan 22, 2026

ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; वाडी-वस्तीवर जावून शासकीय योजनांची दिली जाते माहिती


तरुणांना रोजगार व उद्योग उभारणीसाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी संस्था कटिबध्द -विनोद साळवे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कामगार वर्गाला शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच गावोगावी मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात नुकतीच नगर तालुक्यापासून करण्यात आली असून ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर जाऊन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचा संस्थेचा मानस आहे.


जनकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद साळवे यांच्या पुढाकारातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, त्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणे आणि लाभार्थ्यांची नोंदणी करून देणे, तसेच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.


या अभियानाची सुरुवात नगर तालुक्यातील निंबोडी व दरेवाडी या गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करून करण्यात आली. या शिबिरांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आजारांबाबत मार्गदर्शन केले तसेच आवश्‍यक औषधोपचारही करण्यात आले. आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्षित राहणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


यावेळी दरेवाडीचे उपसरपंच अनिल करांडे, ग्राम विस्तार अधिकारी संपत दातीर, छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, डॉ. नंदा वाघ, कृषी अधिकारी उस्मान शेख, विस्तार अधिकारी पवार मॅडम, आरपीआयच्या महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, निंबोडीचे माजी सरपंच बाबुराव बेरड, जनकल्याण संस्थेचे राज्य संपर्कप्रमुख शिवाजीराव बेरड, निंबोडी ग्राम विस्तार अधिकारी नरसाळे, दरेवाडी ग्रामपंचायत सदस्य अनिताताई आंग्रे, जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक सौ. दौंड, जनकल्याण संस्था महिला जिल्हाध्यक्ष उज्वला गवळी, प्रदेशाध्यक्ष विजय लोंढे, धडक जनरल कामगार संघटना जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, शिवसेना सामाजिक न्याय विभाग उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब भिंगारदिवे, कृष्ण कांबळे, परविन शेख, प्रीती साळवे, मालन जाधव, ॲड. सागर बेरड आदी विविध विभागांचे सरकारी कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर युवा उद्योजक व बेरोजगार तरुणांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत व्यवसाय व शासकीय योजनांची मोफत माहिती देण्यात आली. जिल्हा कृषी विभागातर्फे शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर यांच्यातर्फे बांधकाम कामगारांसाठी मोफत नोंदणी करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.


विनोद साळवे म्हणाले की, “ग्रामीण भागातील अनेक नागरिक आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी व शासनाच्या योजनांपासून केवळ माहितीअभावी वंचित राहतात. हीच दरी दूर करण्यासाठी जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमातून ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जात असून, तरुणांना रोजगार व उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकरी बांधवांना कृषी योजनांची माहिती, तर बांधकाम कामगारांना नोंदणी व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, गाव व वाडी-वस्तीवर जाऊन अशा स्वरूपाचे शिबिरे आयोजित करून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. समाजाच्या सर्व घटकांच्या सहकार्यानेच हे अभियान यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *