व्यापारी व नागरिकांच्या अपेक्षा विकासाभोवतीच -डॉ. इकराम तांबटकर
बाजारपेठेतील वाहतूक, गर्दी व स्वच्छतेसाठी ठोस उपायांची केली अपेक्षा व्यक्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजे शहाजी रोड (घास गल्ली) व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार पार पडला. या कार्यक्रमात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नगरसेवकांचा व्यापारी वर्गाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक पै. सुभाष लोंढे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संभाजी कदम, परेश लोखंडे, शम्स खान, ढोणे तसेच जितू गंभीर यांचा सत्कार करण्यात आला.
व्यापारी मित्र मंडळाने नवनिर्वाचित नगरसेवकांकडून बाजारपेठेतील समस्या, वाहतूक, स्वच्छता व विकासकामांसाठी सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. इकराम तांबटकर, जुनेद तांबटकर, हाजी जलील, मंगेश रासने, इरफान तांबटकर, अल्ताफ पवार, खालिद तांबटकर, अंजुम तांबटकर, इमरान तांबटकर, मजर शेख, महेश गुगळे, नफिस चुडीवाले, संकेत पोखरणा, यासिन पवार, अमर वर्मा, ॲड. तांबटकर, कमलेश जव्हेरी, जीशान तांबटकर, भगवान बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. इकराम तांबटकर म्हणाले की, “नागरिकांना नगरसेवकांकडून राजकारण नव्हे तर केवळ विकासाची अपेक्षा असते. निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून निवडणूक संपल्यानंतर सर्व प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याची खरी जबाबदारी नगरसेवकांवर येते. कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. राजे शहाजी रोड व घास गल्ली परिसर ही शहराची महत्त्वाची बाजारपेठ आहे. येथे वाढती गर्दी, अपुरी पार्किंग व्यवस्था व वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपायांची गरज आहे. नवनिर्वाचित नगरसेवक या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून निश्चितच प्रभावी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अल्ताफ पवार म्हणाले की, व्यापारी आणि नागरिक हे शहराच्या विकासाचे दोन महत्त्वाचे घटक आहेत. बाजारपेठ सुरळीत चालण्यासाठी सुरक्षितता, स्वच्छता आणि वाहतुकीचे योग्य नियोजन अत्यावश्यक आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यापारी वर्गाशी सातत्याने संवाद ठेवून बाजारपेठेतील अडचणी सोडवाव्यात. व्यापारी मित्र मंडळ शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करेल. सर्वांनी मिळून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला. नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कटिबध्द राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
