• Wed. Jan 21st, 2026

सावित्री ज्योती महोत्सवात महिलांची आरोग्य तपासणी

ByMirror

Jan 21, 2026

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवक कल्याण योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकीचा उपक्रम


महिलांचे आरोग्य सुदृढ असेल, तर कुटुंब व समाज सुदृढ राहतो -मंगल भुजबळ

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीवन आधार प्रतिष्ठान, मुंबादेवी प्रतिष्ठान, प्रगती फाउंडेशन, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, माहेर फाउंडेशन, उडान फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित सावित्री ज्योती महोत्सवात युवक कल्याण योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.


या आरोग्य शिबिरामध्ये महिलांसह प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये दंत तपासणी, महिला आरोग्य तपासणी, होमिओपॅथी व आयुर्वेद तज्ज्ञांकडून उपचार तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. रक्तदान शिबिरात बचत गटातील महिलांनी सामाजिक भान जपत मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.
आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मंगल भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज, वडगाव गुप्ता येथील विभागप्रमुख डॉ. निखिल बोंबले, जिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक डॉ. शर्मिला कदम, डॉ. विनय इदे, काकासाहेब म्हस्के मेडिकल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अबोली कुलकर्णी, सुरभी हॉस्पिटल संचलित ब्लड बँकेचे डॉ. राजेंद्र पवार, तसेच संपूर्ण सुरक्षा केंद्राचे अधिकारी शिवाजी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


प्रास्ताविकात महोत्सवाचे मुख्य संयोजक व जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले की, दरवर्षी सावित्री ज्योती युवा महोत्सवाच्या माध्यमातून महिलांची आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. सलग दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने सुरू असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मंगल भुजबळ म्हणाल्या की, सावित्री ज्योती महोत्सव हा केवळ सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्यक्रम नसून तो समाजप्रबोधन व आरोग्य जागृतीचा एक प्रभावी मंच आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ असेल, तर कुटुंब व समाज सुदृढ राहतो. आजच्या धावपळीच्या जीवनात महिलांकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी या प्रकारची मोफत आरोग्य तपासणी शिबिरे अत्यंत उपयुक्त ठरतात.


बचत गटातील महिलांनी रक्तदान करून समाजासाठी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि महिलांनी या कार्यात पुढाकार घेणे ही सामाजिक बदलाची नांदी आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविणाऱ्या सर्व संस्था, संयोजक व स्वयंसेवकांचे कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अनंत द्रविड, अनिल साळवे, आरती शिंदे, वैशाली कुलकर्णी, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. तुषार शेंडगे, मनीषा शिंदे, जयेश शिंदे, ॲड. पुष्पा जेजुरकर, बाबू काकडे, स्वाती डोमकावळे, रजनी ताठे, अश्‍विनी वाघ आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *