ग्रामीण भागातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटतात -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील उपशिक्षक प्रमोद नाथा थिटे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ तसेच धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.
बी दी चेंज फाउंडेशनच्या वतीने मुंबई येथे आयोजित समारंभात प्रमोद थिटे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या गौरवाची दखल घेत नवनाथ विद्यालयात विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवनाथ विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते प्रमोद थिटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शरद भोस, मंदा साळवे, तेजस केदारी, स्वाती इथापे, तृप्ती वाघमारे, तुकाराम पवार, आप्पासाहेब कदम, दिपाली म्हस्के-ठाणगे, रेखा जरे-पवार, निकिता रासकर-शिंदे, राम जाधव, लहानु जाधव तसेच ग्रंथपाल बाळासाहेब कोतकर आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतात. प्रमोद थिटे यांचे कार्य हे केवळ अध्यापनापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि समाजभान निर्माण करणारे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, ही निमगाव वाघा गावासाठी अभिमानाची बाब आहे. अशा शिक्षकांमुळेच ग्रामीण शिक्षणाची गुणवत्ता उंचावत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, प्रमोद थिटे हे नवनाथ विद्यालयाचे उपशिक्षक असून त्यांनी नेहमीच अध्यापनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम, त्यांची शिस्तप्रियता आणि विद्यार्थ्यांशी असलेली आपुलकी या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळालेला सन्मान हा शाळेसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमोद थिटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व सचिव सुमन कुरेल यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
