• Wed. Jan 21st, 2026

मावशीच्या घरी जाऊन विवाहितेला मारहाण व विनयभंगाचा आरोप

ByMirror

Jan 18, 2026

पती व सासऱ्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


फोनवरील शिवीगाळानंतर थेट घरात घुसून हल्ला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक वादातून एका विवाहितेवर तिच्या पती व सासऱ्याने गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचा तसेच विनयभंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पती वैभव पोपट कराळे व सासरे पोपट राधाजी कराळे (रा. साईनाथ बंगला, औसरकर मळा, नानाजी नगर, सारसनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी विवाहितेच्या तक्रारीनुसार, दि. 16 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास त्या सावेडी येथील गावडे मळा परिसरात मावशीच्या घरी असताना पती वैभव यांनी फोन करून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अश्‍लील व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या दरम्यान, रात्री सुमारे 8.20 वाजता सासरे पोपट कराळे थेट मावशीच्या घरी आले आणि कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
मारहाणीच्या वेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्याने त्यांची आई , मावशी व काका भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले. मात्र, आरोपी सासऱ्याने त्यांनाही लाकडी काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या आईच्या उजव्या हातावर काठीने मारून ढकलून दिल्याचा आरोप असून, मावशी व काकांनाही मारहाण करण्यात आली.


या गोंधळात सासऱ्याने फिर्यादी महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे. तसेच, “तुम्ही माझ्या नादी लागलात तर तुम्हाला मारून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्याचे सांगण्यात आले आहे.


फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह 31 जानेवारी 2023 रोजी वैभव कराळे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार किरकोळ कारणांवरून वाद होत असल्याने त्या जानेवारी 2025 पासून आई-वडिलांकडे गुजरात येथे वास्तव्यास आहेत. दरम्यान, पतीने घटस्फोटासाठी अहिल्यानगर येथील न्यायालयात दावा दाखल केला असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे.


घटनेनंतर जखमी झालेल्या फिर्यादी व त्यांच्या आईला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पाठवले. उपचारानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पती व सासऱ्याविरोधात मारहाण, विनयभंग, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *