‘उद्या महापौर आणि आमदारही शिवसेनेचाच’ -विक्रम राठोड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रतिकूल परिस्थिती, दबाव आणि विरोधी प्रवाहाला छेद देत शिवसेना शिंदे गटाचे दहा नगरसेवक विजयी झाले. या यशाबद्दल चितळे रोड येथील स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या कार्यालयात विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
शिवसेनेचे युवा नेते विक्रम राठोड यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक सुरेखा कदम, मंगल लोखंडे, सुनीता गेनाप्पा, रूपाली दातरंगे, वैशाली नळकांडे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, दत्तात्रय कावरे, गणेश कवडे व नवनाथ कातोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी कदम, शाम नळकांडे, संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बोलताना विक्रम राठोड म्हणाले की, “काही जागांवर अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी तो पराभव नसून पुढील लढ्याची नांदी आहे. पुढील पाच वर्षे महानगरपालिकेत शिवसेना सत्ताधाऱ्यांची झोप उडवेल. नगर शहरातील प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना आक्रमकपणे मांडेल.”
ते पुढे म्हणाले, “आज दहा नगरसेवक आहेत, उद्या नगरचा महापौर आणि आमदारही शिवसेनेचाच असेल. नगरच्या राजकारणात शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने फडकणार आहे. हे कोणीही रोखू शकत नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
