• Wed. Jan 21st, 2026

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘आप’चा जोरदार रोड शो; सावेडीत मोटारसायकल रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन

ByMirror

Jan 14, 2026

प्रभाग क्र. 7 ड मधील उमेदवार भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली


विकास, पारदर्शकता व स्वच्छ प्रशासनाचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. 13 जानेवारी) आम आदमी पार्टीच्या वतीने सावेडी उपनगरात भव्य मोटारसायकल रॅली काढून रोड शो करण्यात आला. प्रभाग क्रमांक 7 ड मधील आम आदमी पार्टीचे उमेदवार खाकाळ भरत श्रीराम यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात येऊन, शक्तीप्रदर्शन करण्यात आले.


सावेडी गावठाण येथील खंडोबा मंदिरापासून या प्रचार रॅलीची सुरुवात झाली. यावेळी ढोल-ताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळाला. मोटारसायकली, रिक्षा तसेच विविध वाहनांमधून प्रचार फेरी काढण्यात आली. उमेदवार भरत खाकाळ यांनी रॅलीदरम्यान मतदारांना हात जोडून नम्रपणे सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
रॅलीच्या मार्गावर विविध चौक-चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत उमेदवार खाकाळ यांचे हार घालून स्वागत करण्यात आले.

“प्रभागाचा विकास, स्वच्छ प्रशासन”, “भ्रष्टाचारमुक्त महापालिका” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ही रॅली भुतकरवाडी, भिंगारदिवे मळा, सावेडी गाव, रासने नगर आदी भागांतून मार्गक्रमण करत तुळजाभवानी मंदिर येथे समारोप झाली. या रॅलीत आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


यावेळी उमेदवार भरत खाकाळ बोलताना म्हणाले की, “महापालिकेत टक्केवारीच्या नगरसेवकांमुळे प्रभागाचा अपेक्षित विकास होत नाही. सत्ताधारी आधी स्वतःचा विकास साधतात आणि नंतर प्रभागाकडे दुर्लक्ष करतात. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्‍नांना न्याय मिळत नाही.” प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा व शिक्षणाशी संबंधित प्रश्‍न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेले, अभ्यासू व निष्कलंक उमेदवार निवडून देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


आम आदमी पार्टीच्या वतीने स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा सुधारणा, दर्जेदार रस्ते, प्रभावी कचरा व्यवस्थापन, सक्षम आरोग्य सेवा, शाळांचा दर्जा उंचावणे तसेच सार्वजनिक सुविधांचा विकास करण्याचा ठोस निर्धार व्यक्त करण्यात आला. दिल्ली व इतर राज्यांतील ‘आप’ सरकारच्या कामगिरीचा दाखला देत, अहिल्यानगरमध्येही पारदर्शक, लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *