विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याचा सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्रदान करण्यात आल्याची माहिती अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.पी. सुमनाक्षर यांनी दिली.
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. ग्रामीण भागात काव्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. तर वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लावण्याचे कार्य ते करत आहे. विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
