ॲड. राजेश कावरे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथील परिवार मंगल कार्यालयात सोमवार, दि. 12 जानेवारी रोजी चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडणार आहे. ग्रामीण भागातील साहित्य, संस्कृती, सामाजिक जाणिवा व नव्या विचारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे.
या प्रज्ञावंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधीज्ञ ॲड. राजेश दत्तात्रय कावरे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक पै. नाना डोंगरे यांनी दिली. ग्रामीण साहित्य चळवळीला चालना देण्याबरोबरच सामाजिक प्रबोधन व युवकांमध्ये सकारात्मक विचारांची बीजे रोवणे, हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. राजेश कावरे हे अहमदनगर बार असोसिएशन तसेच कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे माजी खजिनदार असून सध्या ते कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या सचिव पदाची जबाबदारी पार पाडत आहेत. विधी क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून न्यायालयीन कामकाजाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अनेक सामाजिक संघटनांमध्ये ते योगदान देत असून, न्याय, समता व सामाजिक सलोखा या मूल्यांसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत.
या साहित्य संमेलनाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. राजेश कावरे यांच्या हस्ते सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
