विवेक कुलकर्णी यांच्या नियुक्तीबद्दल लोंढे परिवाराकडून सत्कार
बजरंग दलाच्या राष्ट्रीय जबाबदारीसाठी विवेक कुलकर्णी यांचे नेतृत्व प्रेरणादायी -पै. सुभाष लोंढे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक घडामोडींना वेग आला असताना, नुकतेच बजरंग दलाच्या राष्ट्रीय सहसंयोजकपदी नियुक्त झालेले विवेक कुलकर्णी यांनी माजी नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान लोंढे परिवाराच्या वतीने विवेक कुलकर्णी यांची नुकतीच निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, इंजि. जयकुमार पादिर, ॲड. जय भोसले, निलेश चिपाडे, गणेश पाटील, कमलेश भंडारी, केतन गुंदेचा, निकेश मुथा, गोपाळ सहदेव, अमित लड्डा, सागर शहा, रमेश गावडे, ऋषीकेश खांडरे, दत्ता पाटील, ॲड. अक्षय दांगट, वैभव शिंदे, योगेश जाधव, शुभम गट्टाणी, पै. मनोज लोंढे , पै. ओंकार लोंढे, पै. दिनेश लोंढे, तेजस थापा, आशितोष वाघमारे, किरण भागानगरे, विलास कांडेकर, महावीर कांकरिया आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी विवेक कुलकर्णी यांच्या सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. धर्मजागरण, हिंदू समाज संघटन आणि युवकांना सकारात्मक दिशेने मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेतली गेल्याचे स्पष्ट केले.
माजी नगरसेवक सुभाष लोंढे म्हणाले की, बजरंग दलाच्या माध्यमातून विवेक कुलकर्णी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने धर्मजागरण, धर्मप्रसार व हिंदू समाज संघटनाचे भरीव कार्य केले आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी आहे. त्यांच्या या प्रामाणिक, निष्ठावंत आणि कार्यक्षम कामाची दखल घेतच त्यांची बजरंग दलाच्या राष्ट्रीय सहसंयोजकपदी निवड झाली आहे. ही केवळ त्यांची वैयक्तिक यश नसून अहिल्यानगर जिल्ह्यासाठीही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दलाचे कार्य देशपातळीवर अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना विवेक कुलकर्णी म्हणाले की, हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून, माझ्यासोबत कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. बजरंग दलाने माझ्यावर जी राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे, ती मी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पार पाडेन. धर्मजागरण, संस्कृती संवर्धन आणि युवकांना राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करणे हेच माझ्या कार्याचे केंद्रबिंदू राहतील. भविष्यात समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
