• Wed. Dec 31st, 2025

अरणगाव ते बाबुर्डी खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्ती कामाला सुरुवात

ByMirror

Dec 12, 2025

विजय भालसिंग यांच्या पाठपुराव्याला यश


पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती. अनेक ठिकाणी खोल, मोठे व जीवघेणे खड्डे तयार झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक अक्षरशः धोकादायक झाली होती. सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी या प्रश्‍नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. अखेर त्यांच्या पाठपुराव्यानंतर रस्त्याच्या तातडीच्या पॅचिंग कामाला सुरुवात झाली आहे.

विजय भालसिंग


अरणगाव ते बाबुर्डी घुमट या सुमारे 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरातील रस्त्याची अवस्था गेल्या काही महिन्यांत अत्यंत बिकट झाली. रस्त्यात इतके खड्डे निर्माण झाले होते की नागरिकांमध्ये “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली होती. वाहनचालक, दुचाकीस्वार आणि प्रवासी यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालक पडून जखमी झाले, या रस्त्यावरुन दररोज मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाले. तर प्रवाशांना मणक्याचे त्रास, पाठदुखी यांसारख्या समस्या वाढल्या होत्या.


सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी या गंभीर स्थितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. नुकतेच अरणगाव ते बाबुर्डी रस्त्याच्या पॅचिंग कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.


हा रस्ता वाळकीसह अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. येथे केवळ खड्डे बुजवणे पुरेसे नाही, तर पॅचिंगचे काम दर्जेदार आणि टिकाऊ व्हायला हवे. अन्यथा काही दिवसांत हीच परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. नागरिकांचा प्रश्‍न मुळातून सुटण्यासाठी योग्य नियोजन करून रस्ता दर्जेदार पद्धतीने दुरुस्त करणे आवश्‍यक असल्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *