जय हिंद फाउंडेशनची मागणी; चार तालुक्यांच्या मध्यभागी असलेले गाव सर्वांसाठी ठरणार सोयीचे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी गावाचे ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ असे नामकरण करून या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती शिवाजी पालवे यांनी दिली.
चिचोंडी गाव हे चार तालुक्यांच्या सीमेवर मध्यवर्ती ठिकाणी आहे. चार तालुक्यांच्या सीमांना जोडणारे हे गाव आहे. एका बाजूला पाथर्डी तालुका, दुसऱ्या बाजूला नगर तालुका, तर जवळच नेवासा, राहुरी आणि शेवगाव तालुक्यांच्या सीमा आहेत. या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे या परिसरातील गावांना शासकीय कामांसाठी 50 किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागतो. चिचोंडीचे नामकरण ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ करून तालुक्याचा दर्जा दिल्यास या पंचक्रोशीतील गावांना जास्तीत जास्त 25 किलोमीटरवरच तालुका उपलब्ध होईल. त्यामुळे शासकीय कार्यालये, दैनंदिन कामकाज आणि शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार यांच्या आवश्यक सेवा जवळ मिळणार आहेत.
चिचोंडी हे राष्ट्रसंत आनंदऋषी महाराजांचे जन्मस्थळ असून गावाची ओळख आज “देवभूमी” म्हणून वाढत आहे. येथे त्यांचे भव्य मंदिर, धार्मिक स्थळे, तसेच कॉलेज व विद्यालयेही आहेत. लाखो भक्त येथे भेट देतात, त्यामुळे गावाला भविष्यात ‘जैन समाजाची पंढरी’ म्हणून ओळख निर्माण होण्याची क्षमता आहे. गावाचे नामकरण ‘आनंदनगर’ केल्यास राष्ट्रसंतांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव होईल, अशी भावना जय हिंद फाउंडेशनने व्यक्त केली आहे.
या गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास सोयी-सुविधांचा विकास वेगाने होणार. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी, शेतकऱ्यांना कृषी विभागाची सेवा, नोकरदार व नागरिकांना प्रशासकीय कार्यालये, व्यापारउद्योगांना आवश्यक परवाने व सुविधा जवळच उपलब्ध होतील, यामुळे वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गावाचे धार्मिक, भौगोलिक आणि प्रशासकीय महत्त्व लक्षात घेता ‘आनंदनगर (आनंदतीर्थ)’ हे नामकरण व तालुका दर्जा हा या भागाच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. सर्व गावांच्या वतीने सदर निवेदन पाठविण्यात आल्याचे शिवाजी पालवे यांनी सांगितले आहे.
