शहर सहकारी बँकेने शहरातील व्यावसायिक, उद्योजकांना आर्थिक आधार दिला -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहर सहकारी बँकेच्या व्हॉईस चेअरमन पदावर प्रा. माणिक विधाते यांची संचालक मंडळाने एकमताने आणि बिनविरोध निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रा. विधाते यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमास जिल्हा उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे, बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, अशोक कानडे, संजय घुले, सुजित बेडेकर, शिवाजी कदम, निखिल नहार, संचालिका रेश्मा आठरे, स्वाती कांबळे, संचालक डॉ. भूषण अनभुले, प्रदीप जाधव, दत्तात्रय रासकोंडा, सीईओ दिनेश लोखंडे, कर्मचारी प्रतिनिधी संतोष मखरे, राजेंद्र गायकवाड, प्रकाश वैरागर, महेश पालवे तसेच अनिल मुरकुटे, देविदास पारधे, गणेश गोंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शहर सहकारी बँकेने सातत्याने शहरातील व्यावसायिक, उद्योजक आणि सर्वसामान्यांना आर्थिक आधार दिला आहे. महाराष्ट्रात बँकेच्या पाच शाखा कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून शहरीकरण आणि व्यावसायिक वाढीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॉईस चेअरमन प्रा. माणिक विधाते म्हणाले की, बँकेचे चेअरमन सीए गिरीश घैसास आणि ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आर्थिक परिस्थिती अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती सुधारणा व ठोस पावले उचलली जातील. सेवक वर्ग, अधिकारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने परिस्थिती आणखी सुधारण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर बँकेचे महाराष्ट्र कार्य क्षेत्र असून, त्याची अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, पिंपरी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे 17 शाखा कार्यरत आहेत. बँकेचे डिपॉझिट 441 कोटी रुपये असून, कर्ज वाटप 250 कोटी आणि व्यवसाय 692 कोटीचा आहे. 126 सेवक कर्मचारी कार्यरत आहेत. 27 हजार 687 सभासद आहेत. खेळते भांडवल 464 कोटी 22 लाख रुपये आहे. बँकेत यूपीआय सेवा, कोअर बँकिंग प्रणाली, एटीएम रुये कार्ड, जीएसटी पेमेंट, खातेदारांना मोबाईल ॲपद्वारे आयएमपीएस सुविधा, एसआयपी सुविधा सुविधा उपलब्ध आहेत.
