• Wed. Dec 3rd, 2025

बोल्हेगावात महिलांसाठी शिवणकाम व पार्लर प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

ByMirror

Dec 2, 2025

कौशल्य विकासातून महिलांचे सशक्तीकरण जन शिक्षण संस्थेचा उपक्रम


कौशल्य आत्मसात करा आणि स्वावलंबी बना -बाळासाहेब पवार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय अंतर्गत संचालित जन शिक्षण संस्था व प्रणिती फॅशन व पार्लरच्या वतीने बोल्हेगाव येथे महिलांसाठी शिवणकाम व पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाला बोल्हेगाव व परिसरातील महिला तसेच युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, अनिल तांदळे, मनीषा शिंपी, पूजा शिंपी, सचिन शिंपी, विजय बर्वे आदींसह मोठ्या संख्येने महिला व युवती उपस्थित होत्या.


शिबिरात शिवणकाम, ब्युटी पार्लरचे व्यावसायिक प्रशिक्षण, ग्रूमिंग, सेल्फ-एम्प्लॉयमेंट तंत्रे, व्यवसाय उभारणी मार्गदर्शन अशा अनेक कौशल्यांचा समावेश असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शफाकत सय्यद म्हणाले की, कौशल्य विकास हा आजच्या युगातील सर्वात मोठा आधार आहे. महिलांनी विविध कौशल्य आत्मसात करून स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पाहिजे. जन शिक्षण संस्था ग्रामीण भागात महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. या प्रशिक्षणातून महिलांना घरबसल्या रोजगार मिळू शकतो, लघु व्यवसाय उभारता येतो व आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होतो. अनेक महिलांनी यापूर्वी घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आधारे स्वतःची छोटी-मोठी उद्योगसंस्था सुरू केली आहे, काहींनी शिवणकाम, पार्लर सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असल्याचे त्यांनी सांगितले.


बाळासाहेब पवार म्हणाले की, भारतीय संविधानाने महिला व पुरुषांना समानतेचा, स्वाभिमानाने जगण्याचा आणि इच्छित व्यवसाय निवडण्याचा अधिकार दिला आहे. समाजातील प्रत्येक महिलेला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून देणे हीच खरी संविधानाचे महत्त्व आहे. आज महिलांना सक्षम करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कौशल्य प्रशिक्षण. उद्योग-व्यवसायात उतरण्यासाठी महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, शिवणकाम क्षेत्रात आज भरपूर संधी उपलब्ध आहेत. कौशल्य प्रशिक्षणामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. समाजात आत्मविश्‍वासाने उभे राहता येते. स्वतंत्र निर्णय घेण्याची ताकद मिळते. महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नव्हे, तर आत्मविश्‍वास, स्वाभिमान आणि सामाजिक नेतृत्वाची सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.


मनीषा शिंपी आणि पूजा शिंपी महिलांना शिवणकाम व ब्युटी पार्लरचे सखोल प्रशिक्षण देणार असून, प्रत्यक्ष सराव, तांत्रिक मार्गदर्शन आणि व्यवसाय उभारणीचे शिक्षणही दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अनिल तांदळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *