थंडीनिमित्त मतीमंद मुले, निराधार व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि चादरचे वाटप
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपताना वंचित समाजातील घटकांना मदतीचा हात महत्त्वाचा आहे. ज्यांना सर्वकाही मिळाले, त्यांचे दातृत्व समाजासाठी महत्त्वाचे ठरत आहे. ज्यांना काही नाही त्यांच्यासाठी सधन व्यक्तींनी उत्पन्नातील एक भाग द्यावा. अंतिम ध्येय पैसा नसून, दातृत्वातील समाधान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वासन उद्योग समूहाचे चेअरमन विजय वासन व तरुण वासन यांच्या मार्गदर्शनाखाली थंडीनिमित्त तपोवन रोड येथील अपंग संजीवनी मतीमंद मुलांच्या निवासी शाळेतील मतीमंद मुले, केडगाव येथील सावली संस्थेतील अनाथ व निराधार विद्यार्थी तसेच घर घर लंगर सेवा व मुकुंदनगर येथील संबोधी विद्यार्थी (चेतन हॉस्टेल) वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी 100 बेडशीट आणि 200 ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुम येथे झालेल्या ब्लँकेट व चादर वाटप कार्यक्रमाप्रसंगी पद्मश्री पवार बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते अमेय साठे (दिल्ली), आनंदऋषी नेत्रालयाचे आनंद छाजेड, डॉ.सुमित शिंदे, डॉ. कुंडलिक राठोड, कमल गायकवाड, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, घर घर लंगर सेवेचे हरजीतसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, दिलीप डुंगुरवाल, अमेय साठे, जनकल्याण रक्त पेढीचे डॉ.मीना फुके, डॉ. सोनाली खांडरे, नितेश बनसोडे, राकेश गुप्ता, संजय आहुजा व वासन परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी माणुसकीच्या भावनेने वासन परिवार सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहे. फक्त पैसा कमविणे ध्येय न ठेवता, वंचित घटकांना त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा आधार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जनक आहुजा म्हणाले की, श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना काळातही स्टच्या वतीने घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून सेवा देण्यात आली. व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य सुरु असल्याचे ते म्हणाले. थंडीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल लाभार्थी संस्थेच्या वतीने श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचे आभार मानण्यात आले.
