• Fri. Nov 14th, 2025

प्रभाग क्रमांक 5 मध्ये रंगणार राजकीय लढत! विकी इंगळे निवडणूक रिंगणात

ByMirror

Nov 14, 2025

माजी नगराध्यक्ष कै. बाबुराव इंगळे यांच्या विकासात्मक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज


राजकीय परंपरेच्या कुटुंबातून घडवलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन राजकारणात सक्रीय -विकी इंगळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचे वारे जोर धरत असताना, प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे. शहरातील राजकीय वारसा असलेले विकी संजय इंगळे यांनी या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरणार आहे.


विकी इंगळे हे शहराचे तत्कालीन पहिले नगराध्यक्ष कै. बाबुराव इंगळे व नगरसेविका सुंदराबाई बाबुराव इंगळे यांचे नातू आहेत. इंगळे परिवाराने नगरच्या राजकारणात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे. कै. बाबुराव इंगळे यांनी आपल्या काळात नगर विकास, पाणीपुरवठा, आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेले कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. सुंदराबाई इंगळे यांनी नवनीतभार्इ बार्शीकर नगराध्यक्ष असताना स्थानिक विकास कामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले होते. हा सामाजिक आणि विकासात्मक वारसा पुढे नेत विकी इंगळे आता सक्रिय राजकारणात पाऊल ठेवत आहेत.


विकी इंगळे म्हणाले की, गेल्या 15 ते 20 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 5 मध्ये कोणतेही भरीव विकासकाम झाले नाही. रस्ते, गटार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आणि सार्वजनिक सोयीसुविधा आजही नागरिकांना भेडसावत आहेत. माझे ध्येय सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि प्रभागाचा चेहरा बदलणे आहे.


त्यांनी पुढे सांगितले की, राजकारण हे माझ्यासाठी सत्ता नव्हे तर सेवा करण्याचं माध्यम आहे. माझ्या आजोबा-आजींनी घडवलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन मी जनतेचा विश्‍वास संपादन करू इच्छितो. नागरिक व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी जाहीर केले.


प्रभाग 5 मध्ये वाढती लोकसंख्या, नागरी समस्यांचा बोजा, तसेच जुनी पायाभूत सुविधा हे मुख्य प्रश्‍न आहेत. विकी इंगळे यांनी निवडणुकीच्या प्रचारात “विकास, पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा थेट सहभाग” या तीन मुद्द्यांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच प्रभागात मतदारांशी संवाद मोहिमाही सुरू केली असून, तरुण वर्गात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *