पोस्ट मॅपिंगच्या अडचणीमुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनाचा प्रश्न
शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळवून देण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आश्वासन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या तोंडावर पोस्ट मॅपिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे शालार्थ प्रणालीत वेतन थांबण्याचा धोका निर्माण झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 14 ऑक्टोबर) जिल्हा परिषद समोर माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सर्व कामकाज एका दिवसात पूर्ण करून दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले. शालार्थ प्रणालीतील संच मान्यता, मॅपिंग स्टेटस आणि ऑथरायझेशन संदर्भात अनेक शाळांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे ऑक्टोबर 2025 चे वेतन देयके फॉरवर्ड करण्यात अडथळे आले. दिवाळीसारख्या सणाच्या काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेतनापासून वंचित राहू नयेत म्हणून आंदोलक शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के आणि कार्यालय अधीक्षक दोधाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दोघांनीही दिवाळीपूर्वी सर्व कामकाज पूर्ण करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. या आंदोलनाचे नेतृत्व प्राचार्य सुनिल पंडित (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ), आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघटना व सोसायटी चेअरमन), बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद), विठ्ठल उरमुडे (राज्य सचिव, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ), ज्ञानदेव बेरड (शहराध्यक्ष मुख्याध्यापक संघ), शिवाजीराव घाडगे (सचिव शहर मुख्याध्यापक संघ), वैभव सांगळे (अध्यक्ष, भाजप शिक्षक सेल), दिलीप काटे (माजी चेअरमन, सोसायटी), शेखर उंडे, बाळासाहेब राजळे, जाकीर सय्यद, आर.एस. औताडे आदींनी केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी शिक्षकवर्गानी अपेक्षा व्यक्त केली आहे.