जपानी तंत्रज्ञानाच्या मशिनरीद्वारे संपूर्ण शरीर तपासणी
आरोग्य म्हणजे संपत्ती -प्रा. भगवान काटे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-कल्याण रोड परिसरात पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था, आधार शक्ती बचत गट, सेफ टी इंडस्ट्रीज व माय लाईफस्टाईल मार्केटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जपानी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने नागरिकांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली.
नगर-कल्याण रोडवरील फॅमिली विश्व मॉल येथे भरलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन परशुराम कोतकर व विजुभाऊ गाडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान काटे होते. यावेळी वेताळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेजर शिवाजी वेताळ, प्रा. खासेराव शितोळे, पंडितराव हराळ, करांडे, भानुदास जगताप, मोहन रौदाळ, काटकर, पर्वत हराळ मेजर, गवळी गुरुजी, हौसराव पवार, पटवेकर, शिंगोटे, ललित डोंगरे, निर्मल, छाया देवढे, कोरेकर, अनिता वेताळ, भगवान शेंडगे, लक्ष्मण म्हस्के, सोनवणे, तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मेजर शिवाजी वेताळ यांनी सांगितले की, समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी सातत्याने विविध ठिकाणी मोफत शिबिरे घेतली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारा हा उपक्रम समाजासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. भगवान काटे म्हणाले की, आरोग्य म्हणजे संपत्ती आहे. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, मानसिक ताणतणाव यांसारखे विकार वाढत आहेत. अशा परिस्थितीत अशा प्रकारची मोफत सर्व रोगनिदान शिबिरे हे समाजासाठी आधार ठरत आहेत. अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने शरीराच्या प्रत्येक अवयवाची तपासणी करणे ही काळाची गरज आहे. वेळेवर निदान झाल्यास गंभीर आजारही सहज टाळता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरात रक्तदाब, साखर, हिमोग्लोबिन, हृदय, हाडांची घनता, यकृत कार्य, फुफ्फुस तपासणी, वजन, बीएमआय आदी चाचण्यांचा समावेश होता. जेष्ठ नागरिक, महिलांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग नोंदवला. आंधळे यांनी आभार मानले.