• Tue. Oct 14th, 2025

समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची निदर्शने

ByMirror

Oct 9, 2025

सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पत्रक प्रकरणी निषेध


समाजात जाणूनबुजून अशांतता पसरविण्याचे कारस्थान रचले जात आहे -एन. एम. पवळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पत्रके भिरकवल्याच्या घटनेचा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.


मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करुन निदर्शने करण्यात आली. सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावरील हल्ला करणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनात कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, उपमहासचिव निवृत्ती आरु, उपाध्यक्ष वसंत थोरात, संघटक सचिव बुद्धानंद धांडोरे, कार्याध्यक्ष कुंदा क्षेत्रे, सचिव छानराज क्षेत्रे, नाशिक उपविभागीय अध्यक्ष ना.म. साठे आदी सहभागी झाले होते.


राज्याध्यक्ष एन. एम. पवळे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ व्यक्तीवरचा नाही, तर भारतीय संविधानावरचा हल्ला आहे. समाजात जाणूनबुजून अशांतता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आली आहे.


त्यांनी पुढे म्हटले की, पोलीस प्रशासनाने केवळ आरोपींना अटक करून थांबू नये, तर या मागील सूत्रधाराला शोधून त्यांना शिक्षा करावी. अन्यथा समाजातील शांतता आणि एकोपा धोक्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


तसेच अशा प्रवृती रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारे घटना वारंवार घडू नयेत यासाठी सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्यावर बुट फेकणारे ॲड. राकेश किशोर तीवारी यांच्यावर गुन्हा दाखल करून, देशात कोणत्याही न्यायालयात त्यांना वकिली करता येऊ नये, त्याची वकिलीची सनद कायम स्वरूपी रद्द करावी, अशी मागणी कास्ट्राईबच्या वतीने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *