सिना नदीलगतच्या वसाहतींमध्ये नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकीट वितरण
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे सिना नदीला आलेल्या पूराने नदीलगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. घरात संपूर्ण पाणी घुसल्याने नागरिकांची दैनंदिन घडी विस्कटली होती. स्वयंपाक करण्याची कोणतीही सोय नसल्याने नागरिक उपाशी राहण्याची वेळ आली. या गंभीर परिस्थितीत गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा नागरिकांच्या मदतीला धावून आली.
लंगर सेवेच्या सेवादारांनी संध्याकाळी कल्याण रोड, शिवाजीनगर आणि परिसरातील विविध कॉलनींमध्ये जाऊन नागरिकांना घरपोच जेवणाचे पाकिट दिले. या पाकिटामध्ये शेवची भाजी, पुलाव, पोळी तसेच मुलांसाठी बिस्किटांचे पाकिट असा संपूर्ण आहार होता. पाण्याने व्यापलेल्या वसाहतींमध्ये अडकलेल्या नागरिकांना ही मदत मोठा दिलासा ठरली.
लंगर सेवेच्या माध्यमातून पंजाब, शेवगाव, पाथर्डी आदी ठिकाणच्या पूरग्रस्तांसाठी मदत पोहोचवली आहे. आता अहिल्यानगर शहरातही पूरग्रस्त भागांमध्ये नागरिकांना अन्नसाहाय्य देण्यात आले. मदतीसाठी पोहोचलेल्या सेवादारांना काही कुटुंबीयांनी, आम्ही जेवण केले आहे, कृपया हे जेवण इतर गरजूंपर्यंत पोहोचवा! अशी भावनिक साद दिली. संकट काळात नागरिकांनी दाखवलेली ही परस्पर सहकार्याची भावना हृदयस्पर्शी ठरली. या मदत उपक्रमात हरजीतसिंह वधवा, अनीश आहुजा, कैलाश नवलानी, सनी वधवा, सुनील थोरात, गुरदित नारंग, सिमरजितसिंह वधवा, गुरनूरसिंह वधवा आदींसह परिसरातील युवराज शिंदे, ओमकार शेडाळे, मार्कस भांबळ, विवेक विधाते, राजू पाडळे आदींनी परिश्रम घेतले.