अवयवदानातून जीवनदान रक्तदानातून मानवतेचा संदेश
आई-वडिलांच्या भावनिक शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत व मानवतेचा संदेश देत शाहूनगर, केडगाव येथे दिवंगत देवा सागर जेदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. माधवनगर मित्र मंडळ आणि प्रतीक बारसे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी आई रोमा सागर जेदिया (आई), सागर जेदिया (वडील), मोहन जेदिया, कैलाश जेदिया, रणजित जेदिया, प्रकाश जेदिया, किरण जेदिया, राजू गुजर, प्रतीक बारसे, संतोष जाधव, प्रवीण पवार, साहिल पंडित, स्वप्निल बनसोडे, दर्शन साळवे आदींसह जेदिया परिवार, रामदेव भजन मंडळ (निफाड) व सुंदरदास भजन मंडळचे (भिंगार) सदस्य उपस्थित होते.
19 वर्षीय देवा सागर जेदिया यांचे काही दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी धैर्य दाखवत ब्रेन डेडनंतर त्यांचे अवयवदान केले. या अवयवदानातून अनेक गरजूंना नवे जीवन लाभले असून, देवाच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित रक्तदान शिबिराने पुन्हा एकदा मानवतेचा दीप प्रज्वलित केला.
या वेळी बोलताना वडील सागर जेदिया भावूक झाले. त्यांनी सांगितले की, माझा मुलगा देवा लहान वयातच आम्हाला सोडून गेला. मात्र त्याने केलेले अवयवदान आणि आज त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ होणारे रक्तदान शिबीर हेच त्याचे खरे आयुष्य आहे. त्याचे शरीर नाही, पण त्याच्या चांगल्या कार्यातून तो आजही जिवंत आहे. समाजासाठी काहीतरी देऊन जाण्याची शिकवण त्याने दिली असल्याचे ते म्हणाले.
आई रोमा सागर जेदिया अश्रू दाबत म्हणाल्या, माझ्या हृदयाचा तुकडा हिरावून घेतला गेला. तरीही माझ्या मुलाने केलेले अवयवदान हा आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. तो जिवंत असताना सगळ्यांसाठी हसतमुख होता, आणि आजही तो अनेकांच्या आयुष्यात प्रकाश पसरवत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि नातेवाईकांसह अनेकजण या हृदयस्पर्शी क्षणी भावूक झाले.
माधवनगर विठ्ठल-रुक्माई मंदिराजवळ आयोजित शिबिरात युवकांनी उत्साहाने रक्तदान केले. श्री आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी पार पडला. भजनी मंडळाच्या भक्तिरसिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भावनिक आणि श्रद्धाभावनेने भारून गेला होता. भक्तिरस आणि सामाजिक कार्याचा सुंदर संगम या शिबिरातून दिसून आला. देवा जेदिया यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दाखविलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अवयवदान आणि रक्तदान या माध्यमातून त्यांनी दिलेला संदेश पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.