आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने सत्कार
आपल्या मातीतून घडलेला दिग्दर्शक, नगरकरांचा अभिमान -प्रा. माणिक विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते नागनाथ मंजुळे यांचे अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. श्री विशाल गणेश देवस्थानचे विश्वस्त प्रा. माणिक विधाते व गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते मंजुळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक राजेंद्र भंडारी, सचिन पवार, अभिजीत खोसे, समीर दाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आपल्या मातीतून घडलेल्य दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांचा सन्मान आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. एखाद्या सामान्य गावातून निघालेला तरुण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करतो, ही बाब सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मंजुळे यांनी चित्रपटांद्वारे ग्रामीण समाजाचे वास्तव, त्यातील संघर्ष, स्वप्नं आणि भावना पडद्यावर मांडल्या. फंड्री आणि सैराट सारख्या चित्रपटांद्वारे त्यांनी केवळ मनोरंजनच नाही तर समाजाला विचार करायला भाग पाडले असल्याचे ते म्हणाले.
सचिन जगताप म्हणाले की, मंजुळे यांनी आपल्या चित्रपटातून तरुणाईला नवा दृष्टिकोन दिला आहे. प्रभावी चित्रपटांद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत नवा आयाम आणला. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी वेगळी छाप पाडली आहे. नगरच्या मातीतून घडलेला हा कलाकार आज जगभरात मराठी संस्कृती पोहचवत असल्याचे ते म्हणाले.