सात वर्षांच्या सातत्यपूर्ण स्पर्धेने शहर फुटबॉलमय
कोअर कमिटी, अहमदनगर कॉलेज व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे मोलाचे सहकार्य
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवोदित खेळाडू घडविण्यासाठी व फुटबॉल खेळाला चालणा देण्याच्या उद्देशाने दरवर्षी फिरोदिया शिवाजीयन्स इंटर-स्कूल फुटबॉल स्पर्धा घेतली जात आहे. 2025 मधील सर्व साखळी सामने उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता नियोजन, समर्पण आणि टीमवर्कसाठी एक आदर्श ठरली आहे. सातव्या वर्षी प्रवेश केलेल्या या स्पर्धेने फुटबॉलप्रेमी विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे
या स्पर्धेच्या यशामागे कोअर कमिटीच्या सदस्यांचा महत्त्वाचा वाटा होता. अभिषेक सोनावणे, श्रेया सागडे, पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, राजेश अँथनी आणि सचिन पात्रे यांनी नोंदणी, सामन्यांचे वेळापत्रक, व्यवस्थापन, खेळाडूंचे मार्गदर्शन आणि संपूर्ण संचालनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.
या उपक्रमाला अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रौनप फर्नांडिस व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अहमदनगर कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. सॅवियो वेगस यांचे बहुमूल्य सहकार्यही मिळाले.स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये अहमदनगर कॉलेजच्या ग्राउंड स्टाफचे विशेष योगदान मिळत आहे. मैदान व इतर सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
फिरोदिया शिवाजियन्स एफसीचे खेळाडू हे केवळ सहभागीच नव्हते, तर आयोजनातही सक्रिय भूमिका निभावत त्यांनी प्रयत्नांना अधिक बळ दिले.
या स्पर्धेचे आयोजन नरेंद्र फिरोदिया व मनोज वाळवेकर यांच्या पुढाकाराने दरवर्षी करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे नगरमधील फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले असून, विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना योग्य दिशा मिळत असल्याची भावना खेळाडू व पालकांकडून व्यक्त होत आहे.
