• Fri. Sep 19th, 2025

भारताची जातिव्यवस्था राष्ट्रीय कर्करोग असल्याचा आरोप

ByMirror

Sep 9, 2025

पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने क्रांतीचे पाऊल; दहा वर्षांचा राष्ट्रीय संकल्प घेण्याचे आवाहन


जातश्रेष्ठत्व हा मानसिक कर्करोग तर राष्ट्रीय ऐक्य हा शास्त्रीय पाया -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतामधील जातिव्यवस्था ही केवळ सामाजिक अन्याय नसून राष्ट्रीय दुर्बलतेचे मुळ आहे. न्याय व समानतेशिवाय खरी लोकशाही कधीही टिकू शकत नाही, असा ठाम संदेश पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने देण्यात आला आहे. जातिनाशासाठी आता विचार नव्हे तर कृतीची गरज असून, यासाठी विज्ञानाधारित एकात्म ज्ञानतत्त्व (आयकेटी) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या दोन शस्त्रांचा संगमच युगधर्म असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.


हजारो वर्षांपासून एका जातीमध्येच विवाह करण्याची सक्ती ही केवळ सामाजिक गुलामी नव्हती, तर जैविक आत्महत्या होती. त्यामुळे जीन्स पूल संकुचित झाला, रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, मेंदूची सर्जनशीलता दबली, तरुणाईचे धैर्य कोमेजले. या मानसिक दुर्बलतेमुळेच परकीय आक्रमकांना गुलामगिरीसाठी निमंत्रण मिळाले. त्यामुळे मजबूत, मुक्त आणि बलशाली राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आंतरजातीय विवाह आणि मुक्त जीन्स पूल हा राष्ट्रीय संकल्प असण्याचा संदेश पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने देण्यात आला आहे.


धर्मग्रंथ व परंपरेतील ज्ञानात काही उपयुक्त तुकडे असले तरी जातिवर्चस्व, स्त्रीदमन आणि अंधश्रद्धा हा त्यातील सडका भाग आहे. म्हणजे असा आरसा जो प्रत्येक तुकड्याचे परीक्षण करतो. वैज्ञानिक आणि मानवतावादी गोष्टी स्वीकारतो. अवैज्ञानिक, अमानवी गोष्टी नष्ट करतो. ही प्रक्रिया म्हणजेच जातीच्या स्मृतीतील नॉन-जेनेटिक विषारी माहिती विसर्जित करून नवे समाजमन घडवण्याची चळवळ असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


आयकेटी जर वैचारिक शस्त्रक्रिया असेल, तर एआय हे त्या शस्त्रक्रियेचे धारदार साधन आहे. शिक्षणक्षेत्रात एआय आणले तर प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल की जात ही गुलामी आहे, अभिमान नव्हे. समाजमाध्यमांतून विविधतेतील विवाह, राष्ट्राची ताकद हे पसरवता येईल. व्हिडिओ, गेम्स आणि अभ्याससामग्रीतून जातीविरोधी विचारांची नवी पिढी घडवता येईल.
खरी क्रांती केवळ रस्त्यावर नव्हे, तर शाळा आणि महाविद्यालयांत होणार आहे. अभ्यासक्रमातून स्पष्टपणे शिकवले पाहिजे जात हे विज्ञानविरोधी खोटे आहे, जातश्रेष्ठत्व हा मानसिक कर्करोग आहे. समानता हा केवळ हक्क नव्हे तर राष्ट्रीय ऐक्याचा शास्त्रीय पाया असल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे.


जातिव्यवस्था मोडून काढण्यासाठी पुढील दहा वर्षे निर्णायक आहेत. यामध्ये जातीय स्मृतीतील खोटे विसर्जित करणे, आंतरजातीय विवाहास कायदेशीर व सामाजिक प्रोत्साहन, समान संधी व सन्मानाची संस्थात्मक हमी, बंधुभावाचा व्यापक सामाजिक आंदोलन हे स्विकारण्याची गरज आहे. प्रत्येक नागरिक स्वयंसेवक झाला तर दहा वर्षांत जात हा शब्द केवळ इतिहासात उरेल, असा निर्धार या विचारातून व्यक्त करण्यात आला.


आयकेटी, एआय व शिक्षण या त्रिसूत्रीच्या जोरावर पुढील दशक जातिनाशक क्रांतीचे असावे, अन्यथा समानतेचे स्वप्न उराशी धरून आपण पुन्हा गुलामगिरीत कोसळू, असा इशारा देण्यात आला. आज वेळ आहे प्रखर क्रांतीची जी प्रत्येक माणसाला जातिविरहित मानव बनवेल आणि भारताला प्रबुद्ध, मुक्त व बलशाली राष्ट्र म्हणून उभे करणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *