• Fri. Sep 19th, 2025

विठ्ठल-रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचा हिंदू संस्कृती जपणारा गणेशोत्सव

ByMirror

Sep 2, 2025

धार्मिक सोहळ्याचे आयोजन; विसर्जन मिरवणुकीत डिजेला फाटा देऊन भजनी मंडळाची राहण्आर उपस्थिती


गणेशोत्सव हा आपली संस्कृती जोपासण्याचा उत्सव -सागर पवार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नानाजीनगर औसरकर मळा येथे विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठान दरवर्षी पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत असून यावर्षी देखील हा उत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडत आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर सकाळी काकड भजन आणि संध्याकाळी हरिपाठ व भजनाचे कार्यक्रम दररोज आयोजित केले जात आहेत.


गणेशोत्सव काळात तसेच मिरवणुकांमध्ये साऊंड सिस्टीमवर चित्रपटातील गाणे न लावता फक्त धार्मिक गाणी लावावीत, डिजेला फाटा देऊन उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्मिती झाली असून महिला वर्गासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.


प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा नव्हे तर आपली संस्कृती जपण्याचा आणि भावी पिढीला धार्मिक संस्कार देण्याचा उत्सव आहे. युवकांनी उत्सवात डिजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने भजनी मंडळ, टाळ-मृदंग, हरिपाठ यांच्या माध्यमातून धार्मिक सोहळ्यांचा प्रचार करावा. हा उत्सव समाज एकतेचा आणि संस्कृतीच्या जतनाचा ध्यास घेऊन साजरा करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.


गणेशोत्सवात दररोज गणपतीसमोर विविध धार्मिक कार्यक्रम रंगत असून, या उपक्रमास आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांचे सहकार्य लाभत आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जनाची मिरवणूक डिजेशिवाय, भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात काढण्यात येणार आहे. संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी इतर गणेश मंडळांनीही अशा धार्मिक पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.


प्रतिष्ठानच्या धार्मिक सोहळ्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या आयोजिका अनिता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्मिला काटेकर, रत्नप्रभा घोलप, जयश्री गव्हाणे, शोभा कलमकर, जयश्री उंडे, लता राऊत, रुक्मिणी नवसूपे, सोनाली काळे, सुरेखा चौरे, पुष्पलता गव्हाणे, सरला मुंदडा, चित्रा भोसले, मंगल कराळे, शुभांगी दाणी, उषा शेळके, गया घोलप, कमलताई उकिरडे आदींसह विठ्ठल रुक्मिणी युवा प्रतिष्ठानचे सदस्य परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *