सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहा पो.नि. पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांची नियुक्ती
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात राज्यातील गुणवंत शिक्षक, उत्कृष्ट साहित्यिक व विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून, या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंतांचे परिसंवाद व व्याख्याने होणार असून, मध्य सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील साहित्य व काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच शिक्षक, साहित्यिक व समाजातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान सोहळा होणार आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे-देशमुख यांनी यापूर्वी देखील काव्य संमेलानाच्या प्रमुख पाहुणे पद भूषविले होते.त्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील अर्ज विभागाची जबाबदारी सांभाळत आहे.