हजारो खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; पावसाच्या रिमझिम सरीत नगरकरांनी अनुभवले विविध खेळ
मल्लखांब, तलवारबाजी, एरियल एरोबिक्सच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली मने
ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा विशेष गौरव
नगर (प्रतिनिधी)- खेळांविषयी जागृती निर्माण व्हावी व क्रीडा संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शहरात विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर करत शुक्रवारी (दि.29 ऑगस्ट) रॅली काढण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, जिल्हा ऑलंपिक संघटना, एकविध खेळ संघटना, क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळाचे एक हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि ऑलंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, उप शिक्षणाधिकारी दरेकर, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, संतोष वाबळे, प्रवीण कोंढावळे, क्रीडा अधिकारी प्रियांका खिंडरे, सागर पवार, मीना पाचपुते, साक्षी दळवी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात, सुनील जाधव, मनिषा पुंडे, अंजली देवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी खांब मल्लखांब आणि रोप मल्लखांब यावर चित्तथरारक असे प्रात्यक्षिक खेळाडूंनी सादर केले. मुलींनी सादर केलेल्या एरियल एरोबिक्सने उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकविला. खेळाडूंनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. रिमझिम बरसलेल्या पावसाच्या सरीत नगरकरांना लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा आदी युध्दकलेचे प्रात्यक्षिक अनुभवयास मिळाले. तसेच रॅलीत हॉकी, बॉक्सिंग, स्केटिंग, फुटबॉल, हॉलीबॉल, कराटे, तलवारबाजी, आर्चरी, क्रिकेट आदी खेळांचे चौका-चौकात प्रात्यक्षिक झाले. रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. या रॅलीत लेझीम, झांज व ढोल पथकाने उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करून रंगत आणली होती. एक घंटा, खेळ के मैदान मे!…, हर गली, हर मैदान, खेलेंगा हिंदुस्तान… या घोषणा देत रॅली रंगली होती.
ही रॅली माळीवाडा, पंचवीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा व जुन्या कोर्टाच्या मागच्या बाजूने वाडियापार्क क्रीडा संकुल येथे या रॅलीचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमात रोप मल्लखांब व खांब मल्लखांब चे प्रात्यक्षिक रंगले होते. मल्लखांबावर हातात तलवार घेऊन आणि तोंडातून आग ओकणाऱ्या प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील रंगले होते.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होत आहे. खेळाचा प्रचार-प्रसार होण्याच्या उद्देशाने ही रॅली काढण्यात आलेली आहे. पुढील ओलंपिकचे लक्ष केंद्रीत करुन स्वतंत्र क्रीडा धोरण राबविण्यात आलेले असून, सर्व खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की, निरोगी जीवनासाठी भारताने संपूर्ण जगाला योगा दिला आहे. सध्या भारतात लाइफ स्टाईल बदलल्याने अनेक आजारांना सामना नागरिकांना करावा लागत आहे. निरोगी जीवनासाठी मैदानी खेळाची गरज असून, यासाठी जागृती होण्याची आवश्यकता आहे. खेळातून सशक्त व सदृढ समाज निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले की, सरकारी नोकरीसह प्रत्येक क्षेत्र हा एक खेळ असून, तेथे खेळाडूवृत्तीने टिकावे लागते. सर्वांचा समतोल साधून व सांघिक भावनेने पुढे जावे लागते. खेळात संयम व सातत्य आवश्यक आहे. खेळात प्रामाणिक योगदान दिल्यास यश निश्चित आहे. युवकांनी व्यसनापासून तर खेळाडूंनी नव्याने आलेल्या सप्लीमेंट आणि विविध कृत्रिम गोष्टींपासून लांब राहण्याचे आवाहन केले.
या रॅलीत महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन अहिल्यानगर विभागाचे सचिव शैलेश गवळी,
महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे, अहिल्यानगर मल्लखांब संघटनेचे नंदेश शिंदे, निलेश कुलकर्णी, राजकुमार धोत्रे, अनंत रीसे, मोहिनीराज लहाडे, शंभूसूर्य मर्दानी प्रशिक्षण संस्थेचे बबलू टेकाळे, अमोल निमोणकर, योगा संघटनेचे सचिव उमेश झोटिंग, प्रशिक्षिका प्रणिता तरोटे, जलतरण संघटनेचे रावसाहेब बाबर, टेनिस क्रिकेट संघटनेचे अविनाश काळे, ज्युदो संघटनेचे संजय धोपावकर, हॉकी संघटनेचे आसिफ शेख, फुटबॉल संघटनेचे अभिषेक सोनावणे, खालिद सय्यद, प्रदीप जाधव, मनीष राठोड, तायक्वांदो संघटनेचे अल्ताफ कडकाले, महेश आनंदकर, फेन्सिंग संघटनेचे सुनील गोडाळकर, बॅडमिंटन संघटनेचे मल्हार कुलकर्णी, बॉक्सिंग संघटनेचे शकील सय्यद, रायफल शुटींग संघटनेचे अलीम शेख, कुस्ती संघटनेचे निलेश मदने, बास्केटबॉल संघटनेचे सचिन भापकर, कबड्डी संघटनेचे विनायक भुतकर, अमोल धानापूर्ण, धनुर्विद्या संघटनेचे अमित शिंदे, रोलबॉल संघटनेचे प्रदीप पाटोळे, प्रशांत पाटोळे, रोलर स्केटिंग संघटनेचे सतीश गायकवाड, पॉवर लिफ्टिंग संघटनेचे डेविड मकासरे, अहिल्यानगर बुद्धिबळ संघटनेचे यशवंत बापट, मैदानी संघटनेचे अमित चव्हाण, विश्वेशा मिस्किन, एरोबिक्स संघटनेच्या सुरय्या खैरनार, सिलंबम संघटनेचे डॉ. झिया शेख, किक बॉक्सिंग संघटनेचे सचिन मकासरे, राजमुद्रा करिअर अकॅडमीचे अनिकेत सर, नगरी स्ट्रायकरचे संदिप दातीर, प्रारंभ फिजिकल क्लबचे ज्ञानेश्वर अटक, एम.एस. फिजिकल क्लबचे मोहन शेलार, शिवरक्षक ॲकॅडमीचे संभाजी महाडिक, शिवदल ॲकॅडमीचे पवार, शंभूसूर्य मल्लखांबचे बबलू टेकाळे आदींसह सनफार्मा हायस्कूल, ग. ज. चिंबर विद्यालय व रेसिडेन्शियल हायस्कूलचे लेझीम पथक, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे झांज पथक, रुपीभाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलचे ढोल पथक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश गवळी व रावसाहेब बाबर यांनी केले. आभार भाऊराव वीर यांनी मानले.
ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व प्रशिक्षकांचा गौरव
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक तथा प्रशिक्षक रावसाहेब बाबर, संजय धोपावकर, होनाजी गोडळकर, अनिल म्हस्के, सुरेश बनसोडे, संजय इस्सार आणि माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांचा विशेष गौरव करण्यात आला.