• Sat. Aug 30th, 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवी उभारी

ByMirror

Aug 22, 2025

अभियानामुळे ग्रामीण भागाचे आर्थिक व सामाजिक चित्र बदलणार -आबासाहेब सोनवणे


राज्य शासनाकडून तब्बल 290 कोटींची तरतूद; ग्रामपंचायतींमध्ये उत्साहाचे वातावरण

नगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 17 सप्टेंबरपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सुरू होत आहे. 31 डिसेंबर पर्यंत हे अभियान सुरु राहणार असून, या अभियानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा आर्थिक स्तर उंचावणार असून ग्रामपंचायत पदाधिकारी काम करण्यास उत्साहित होणार आहेत. या अभियानासाठी शासनाने तब्बल 290 कोटी 33 लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी हा इतिहासातील सर्वात मोठा निर्णय आहे. या अभियानामुळे गावागावांत आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होईल, पदाधिकारी जबाबदारीने काम करतील आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली.


भारत सरकारच्या पंचायतराज विभागाने शाश्‍वत विकासाच्या ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी शाश्‍वत विकासाचे नवरत्न ही संकल्पना पुढे आणली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने या अभियानाचा निर्णय घेतला. यामध्ये ग्रामीण भागातील शेवटच्या घटकाला सुविधा सुलभपणे मिळाव्यात, ग्रामपंचायत व्यवस्थेला वेग द्यावा आणि लोकसहभागातून गावांचा विकास घडवावा हा मुख्य हेतू आहे.


मुख्य घटक व गुणांकनचा 100 गुणांची परीक्षा आहे. यामध्ये सुशासनयुक्त पंचायत (16 गुण), सक्षम पंचायत (10 गुण), जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव (19 गुण), मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण (6 गुण), गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण (16 गुण), उपजीविका विकास व सामाजिक न्याय (23 गुण), लोकसहभाग व श्रमदान (5 गुण), नाविन्यपूर्ण उपक्रम (5 गुण) यांचा समावेश आहे.


पुरस्कारांचे स्वरूप ग्रामपंचायत तालुकास्तर प्रथम 15 लाख, द्वितीय 12 लाख, तृतीय 8 लाख, जिल्हास्तर प्रथम 50 लाख, द्वितीय 30 लाख, तृतीय 20 लाख, विभागस्तर प्रथम 1 कोटी, द्वितीय 80 लाख, तृतीय 60 लाख, राज्यस्तर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी
पंचायत समिती विभागस्तर प्रथम 1 कोटी, द्वितीय 75 लाख, तृतीय 60 लाख, राज्यस्तर प्रथम 2 कोटी, द्वितीय 1.50 कोटी, तृतीय 1.25 कोटी.


जिल्हा परिषद राज्य स्तर प्रथम 5 कोटी, द्वितीय 3 कोटी, तृतीय 2 कोटी, याशिवाय प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींना विशेष 5 लाखांचे पुरस्कारही दिले जाणार आहेत.


तत्कालीन ग्रामविकास मंत्री दिवंगत आर.आर. आबापाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून ग्रामीण भागाचे चित्र पालटले. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करून गावांतील वाद मिटवून सामाजिक एकता वाढवली.तब्बल 20 वर्षांनी विद्यमान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकासाला चालना देणारा धाडसी निर्णय घेतला आहे.


अभियानाच्या माध्यमातून गुणांकन व पारितोषिकांची प्रणाली ठरवल्याने ग्रामपंचायतींमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, कोण लखपती होणार आणि कोण करोडपती होणार, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.


या अभियानामागचा उद्देश स्पष्ट करताना सोनवणे म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे व गावोगावी सेवा सुलभ रीतीने पोहोचवणे हे अभियानाचे मूळ ध्येय आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हे अभियान पालकमंत्री डॉ. विखे पाटील, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि सरपंच परिषदेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जाणार आहे. ग्रामपंचायत पातळीवरील बैठकांद्वारे प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *