• Sun. Mar 1st, 2026

कचरा मुक्त शहरासाठी नैतिक फाऊंडेशनचा पुढाकार

ByMirror

Aug 18, 2025

कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा नवा संकल्प


स्वच्छ शहर, ऊर्जावान शहर! या ध्येयाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल -खा. निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- कचरा मुक्त शहर होण्याचा संकल्प घेऊन आणि कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याच्या उद्देशाने नैतिक फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता अभियान मोहिमेला नुकतेच प्रारंभ करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत अरविंद दरेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ही मोहिम राबविण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन खासदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, उद्योजक अल्ताफ शेख, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गुंड, महेश घावटे आदी मान्यवर उपस्थित होते.


फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले की, कचरा मुक्त शहर घडविण्यासाठी कचऱ्याचे योग्य संकलन आणि नियोजनबद्ध निचरा होणे आवश्‍यक आहे. ही जबाबदारी फक्त पालिकेची नसून प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य समजून पुढे यायला हवे. कर्तव्याच्या भावनेतूनच नैतिक फाऊंडेशनने ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.


घरगुती ओला कचरा वापरून त्यापासून स्वयंपाकासाठी उपयुक्त बायोगॅस तयार करता येऊ शकतो. यामुळे अहिल्यानगरचे भविष्य केवळ स्वच्छच नाही, तर ऊर्जावान व पर्यावरणपूरक होणार आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा करून त्याचे व्यवस्थापन केले जाईल. यामुळे शहरात स्वच्छता तर होईलच, पण नवी ऊर्जा निर्मितीही घडणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली.


खासदार निलेश लंके म्हणाले की, कचऱ्यातूनही उर्जेचा स्त्रोत निर्माण होऊ शकतो, ही बाब या प्रकल्पातून सिद्ध होत आहे. कचरा टाकाऊ वस्तू न राहता बायोगॅस निर्मितीचे साधन ठरणार आहे. हा प्रकल्प स्वच्छ शहर, ऊर्जावान शहर या ध्येयाकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. स्वच्छता अभियानाची ही सुरुवात लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही, यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे घरगुती व औद्योगिक वापरासाठी स्वस्त इंधन उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळेल, प्रदूषणात घट होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात स्वच्छ व निरोगी वातावरण तयार होईल. नैतिक फाऊंडेशनचा हा उपक्रम शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नैतिक फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध भागात कचरा गाड्या पाठवून दैनंदिन कचरा वर्गीकृत स्वरूपात संकलित केला जाणार आहे. गोळा केलेल्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती केली जाईल तर सुक्या कचऱ्याचे वेगळे व्यवस्थापन होईल.या अभियानात नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *