नगर (प्रतिनिधी)- नुकतेच नाशिक येथे झालेल्या राज्य सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या आयडियल तायक्वांदोची खेळाडू स्नेहा सचिन शिंदे हिने 39 किलो वजन गटामध्ये कास्य पदक पटकाविले. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करून राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे.
स्नेहा गेल्या 3 वर्षापासून आनंद विद्यालय गुलमोहर रोड येथे प्रशिक्षक अमोल काजळे व रोहित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. ती सावेडी येथील ऑक्झिलियम कॉन्व्हेंट शाळेची विद्यार्थिनी आहे. स्नेहा सेंट मोनिका डीएड कॉलेजचे प्राध्यापक सचिन शिंदे यांची कन्या आहे. या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, तायक्वांदोचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, जिल्हा उपाध्यक्ष संतोष लांडे, राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा सचिव घनश्याम सानप, खजिनदार धर्मनाथ घोरपडे, सहसचिव गणेश वंजारे आदींनी अभिनंदन केले आहे.