सैनिकांसाठी पोस्ट कार्ड सजले देशभक्तीच्या रंगांनी
नगर (प्रतिनिधी)- कागदाची फुले, फळझाडे फुल झाडांच्या बियांची सजावट, छोट्याशा राखीवरच शाडू मातीने साकारलेला युद्धाचा देखावा, राख्यांचे तिरंगी बंध, क्विलिंगच्या सजावटीने साकारलेल्या राख्या, देशभक्तीपर घोषवाक्यांनी सजलेले पोस्ट कार्ड, रंगीत खडू, स्केचपेन व पेन्सिलने राख्या व पोस्ट कार्डातून साकारलेले देशभक्तीचे रंग समर्थ प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. निमित्त होते भारत सरकारच्या टपाल विभाग, अहिल्यानगरच्या वतीने आयोजित भारतीय सैनिकांसाठी राखी व संदेशाचे पोस्ट कार्ड पाठवा उपक्रमाचे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश क्षीरसागर, मुख्याध्यापिका संगीता जोशी, पोस्ट विपणन अधिकारी दीपक तनपुरे, पोस्टमन आजिनाथ खेडकर, किरण शिंदे, हरीश गांगुर्डे, प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील कानडे, शिक्षक डॉ.अमोल बागुल, विवेक भारताल, कु. स्वाती घुले, संतोष आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, एकात्मता आणि कृतज्ञतेचे संस्कार होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्वतःच्या प्राणाचे बलिदान देण्यासाठी सतत सज्ज असलेल्या सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे प्रतिपादन सुरेश क्षीरसागर यांनी केले.
सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या वीर सैनिकांसाठी सुमारे 510 विद्यार्थ्यांनी 1000 पेक्षा अधिक विविध संकल्पनांच्या राख्या व शेकडो पोस्ट कार्ड तयार करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव, कारगिल आदी संकल्पना साकारण्याबरोबरच थ्रीडी कार्टून, फॅशनेबल, ज्वेलरी, डायमंड स्टोनवर्क, मेटल अशा विविध प्रकारच्या हजारो राख्या सैनिकांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्या. देशभक्तीपर घोषवाक्य, थ्रीडी अक्षरलेखन, ग्राफिटी व कॅलिग्राफी व बोरूचा वापर करून देखील विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्डावर देशभक्तीपर संदेश, चित्रे व संकल्पना रेखाटल्या.
