दिलीप कासार यांचा युवकांच्या वतीने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- भारतीय नौसेनेत (जे.सी.ओ.) कार्यरत राहून प्रामाणिकपणे 20 वर्ष सेवा बजावलेले वाळकी गावचे सुपुत्र दिलीप तुकाराम कासार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त गावकऱ्यांकडून त्यांचे स्वागत करुन वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. यावेळी गावातील युवकांनी त्यांचा सन्मान केला.
या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त वाळकी गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कासार यांच्या गौरवासाठी गावातील पंचमुखी हनुमान मंदिरापासून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी ऋषीकेश विजय भालसिंग व गावातील युवकांनी दिलीप कासार यांचा पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
समारंभात विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेते, ग्रामपंचायत पदाधिकारी व मान्यवरांनी कासार यांचे कौतुक करत त्यांनी देशासाठी दिलेल्या सेवाकार्यास सलाम केला. त्यांच्या सेवेचा आदर्श तरुणांनी घेण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली. ह.भ.प. संग्राम बापू भंडारे यांच्या हरिकिर्तनाने सगळे वातावरण भक्तिमय झाले होते.