समाजातील सर्व घटक लायन्सच्या सामाजिक चळवळीशी जोडलेले -राजेंद्र गोयल
डॉ. संजय असनानी व गुरनूरसिंग वधवा यांनी स्विकारली अध्यक्षपदाची सूत्रे
आरोग्य, शिक्षण व पर्यावरणावर संवर्धनावर उपक्रम राबविण्याचा संकल्प
नगर (प्रतिनिधी)- समाजातील गरजूंना आधार देण्याचे काम लायन्स क्लब करत आहे. समाजातील सर्व घटक लायन्सच्या सामाजिक चळवळीशी जोडले गेले असून, शेवटच्या घटकांपर्यंत सेवा देण्याचे कार्य सुरु आहे. लायन्सच्या माध्यमातून समाजात सत्पात्री दान होत असल्याची भावना लायन्सचे द्वितीय प्रांतपाल राजेंद्र गोयल यांनी व्यक्त केली.
अहिल्यानगर शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांचा संयुक्तिक पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात राजेंद्र गोयल बोलत होते. नगर-मनमाड रोड येथील एका हॉटेल मध्ये झालेल्या या पदग्रहण सोहळ्यात लायन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. संजय असनानी व लिओ क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे गुरनूरसिंग वधवा यांनी स्विकारली. या सोहळ्यासाठी किरण भंडारी, प्रशांत मनोत, अरविंद पारगावकर, डॉ. अमित बडवे, जस्मितसिंग वधवा, दिलीप कुलकर्णी, प्रणिता भंडारी, धनंजय भंडारे, हरीश हरवाणी, डॉ. मानसी असनानी, अंजली कुलकर्णी, सीए शंकर अंदानी, राजू जग्गी, अनिश आहुजा, किशोर रंगलानी, डॉ. प्रिया मुनोत, प्रिया रंगलानी, रुचिता कुमार, तनिष्क जग्गी, रीत जाजू, आरोही कांगे, पुणे येथील झेड सी विपिन शेठ, सनी वधवा, गगनप्रीत कौर वधवा, किशोर किथानी, मोहित किथानी, आदींसह लायन्स व लिओ क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अंजली कुलकर्णी यांनी गणेश वंदना सादर केली. पाहुण्यांच्या स्वागत किरण भंडारी यांनी केला. लायन्सक्लबच्या सचिवपदी प्रशांत मनोत, खजिनदारपदी दिलीप कुलकर्णी यांची तर लिओ क्लबच्या सचिवपदी हर्ष किथानी व खजिनदारपदी जगज्योत बग्गा यांची नियुक्ती जाहीर करुन त्यांना पदाची सुत्रे सोपविण्यात आली. राजेंद्र गोयल यांनी नूतन पदाधिकारी कार्याची जबाबदारी समजावून व पदाची शपथ दिली. तर नव्याने लायन्स क्लबमध्ये सदस्यत्व घेतलेल्यांना लायन्स लायनिझमची माहिती दिली.
डॉ. संजय असनानी म्हणाले की, लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या माध्यमातून विविध माध्यमातून सेवा कार्य सुरु आहे. कोरोना काळापासून सुरु करण्यात आलेल्या लंगर सेवेत लायन्सचे महत्त्वाचे योगदान राहिले असून, ती सेवा आजही सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लायन्सच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन आधार दिला जाणार आहे. तर वंचित घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत देण्यासाठी विविध शिबिर घेतले जाणार असून, पर्यावरण संवर्धनासाठी देखील विविध उपक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुरनूरसिंग वधवा यांनी युवक-युवतींच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक कार्यात युवकांना जोडण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.
लायन्सच्या माजी अध्यक्षा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सिमरनकौर वधवा यांनी गोवा ते हैदराबाद विमान प्रवासात 35 हजार फूट उंचीवर एका महिलेचे प्राण वाचवून त्यांनी दाखवलेली तत्परता, वैद्यकीय कुशलता आणि मानवतेची जाणीवेबद्दल त्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. लायन्स क्लबच्या युथ एक्सचेंज उपक्रमातंर्गत स्पेन मधून अहिल्यानगर शहरात आलेल्या मारथा ब्रियोनिस व मॅन्युअल रॉड्रिक्स हे देखील या पदग्रहण सोहळ्यात सहभागी झाले होते.
लायन्सच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. अनघा पारगावकर व लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा यांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष माणकेश्वर, ओम भंडारी यांनी केले. आभार हरजितसिंह वधवा यांनी मानले.