सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांचा उपक्रम; वाचन संस्कृतीला चालना देणारा व महापुरुषांचे विचार रुजविणारा उपक्रम
महापुरुषांच्या इतिहासाची माहिती घेऊन भावी पिढीने प्रेरणा घ्यावी -सुनिल सकट
नगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांनी शालेय विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवन चरित्रावरील पुस्तके व अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य वाचनासाठी भेट देण्यात आले.
सिद्धार्थनगर येथील महाराष्ट्र बालक मंदिर विद्यालयात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करुन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी, कु. आरती सकट आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांसाठी फकिरा ही कादंबरी देखील भेट देण्यात आली.
सुनिल सकट म्हणाले की, दिड दिवसाची शाळा शिकून अण्णाभाऊ साठे यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली. आपल्या साहित्यातून त्यांनी वंचित, दीन-दुबळ्यांचा आवाज बुलंद केला. स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंचे नांव अग्रक्रमाने घेतले जाते. या महापुरुषांनी केलेली लोकजागृती प्रेरणादायी असून, या महापुरुषांचा इतिहास भावी पिढीला ज्ञात होण्यासाठी त्यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तके व त्यांचे साहित्य भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापिका अर्चना गिरी यांनी महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी सुनिल सकट यांनी घेतलेला उपक्रम प्रेरणादायी आहे. यामुळे महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांना समजणार असून, त्यांच्यामध्ये वाचनाची देखील गोडी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.