• Wed. Oct 15th, 2025

केडगावच्या लोंढे मळ्यात दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर

ByMirror

Aug 1, 2025

पोटाचे आजार, दूषित पाणी, नागरिक त्रस्त; नवे पाईपलाईन टाकण्याची मागणी


पाणीप्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा -सुमित लोंढे

नगर (प्रतिनिधी)- केडगावच्या प्रभाग क्रमांक 17 मधील लोंढे मळा परिसरात नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातून जाणारी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन थेट स्थानिक ओढ्यामधून गेल्यामुळे नळाद्वारे घरांमध्ये येणारे पाणी पूर्णतः घाण व मैलामिश्रित होत असून, तातडीने लोंढे मळा परिसरातील जीर्ण झालेली पाईपलाईन नवीन व इतर मार्गाने टाकण्याची मागणी युवा नेते सुमित लोंढे यांनी केली आहे.


दुषित पाण्याच्या गंभीर प्रश्‍नाबाबत लोंढे यांनी स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळासह महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवा नेते सुमित लोंढे, भाजप मंडल अध्यक्ष भरत ठुबे, सुजय मोहिते, अजित कोतकर, अनिकेत निंबाळकर आदी उपस्थित होते.


लोंढे मळा येथील घाण व मैलामिश्रित पाण्यामुळे अनेक नागरिकांना पोटाचे विकार, उलट्या-जुलाबासारखे आजार होत असून, लहान मुले व वृद्धांना याचा अधिक फटका बसत आहे. सध्या नागरिकांना पिण्याचे पाणी इतर ठिकाणाहून आनावे लागत आहे. तर शुद्ध पाण्याची खरेदी करावी लागत आहे.


युवा नेते सुमित लोंढे म्हणाले की, लोंढे मळा परिसरात ओढ्यातून पाईपलाईन गेल्यामुळे नागरिकांना मैलामिश्रित व अत्यंत दूषित पाणी पिण्यास मिळते आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झाली असून त्वरित नवीन पाईपलाईन टाकणे आवश्‍यक आहे. महापालिका प्रशासनाने या प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करुन नवीन पाईपलाईन टाकावी. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.


तसेच मोहिनीनगर, दुधसागर, कांबळे मळा, शास्त्रीनगर या भागांतीलही पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. काही ठिकाणी आठ-आठ दिवस पाणी येत नाही, तर काही ठिकाणी पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये पाणी हा एक संवेदनशील मुद्दा बनला असल्याचे स्पष्ट करुन दोन दिवस आड पाणी सोडण्याची मागणी देखील करण्यात आली.


महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी तत्काळ या पाईपलाईनचे तांत्रिक निरीक्षण करून ती ओढ्यातून काढून त्याची उंची वाढवून इतर ठिकाणाहून नेण्यात येइल. त्यामुळे शुध्द पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच कमी दाबाने पाणी येणाऱ्या भागांत पाईपलाइनची तपासणी करून आवश्‍यक ती दुरुस्ती करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *