पीडित महिलेची पोलीस उपाधीक्षकांकडे तक्रार
आरोपींवर अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेल्याने महिलेचा आक्रोश
नगर (प्रतिनिधी)- जातिवाचक शिवीगाळ व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून अंगावरचे कपडे फाडल्याबद्दल संबंधित आरोपींवर विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची मागणी केडगाव, वैष्णवी नगर मधील पीडित महिलेने केली आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन दिले.
पीडित महिलेने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, घराजवळ काही अंतरावर राहत असलेल्या आरोपींच्या घरा जवळून येणे-जाणे सुरु असते. 26 जुलै रोजी आरोपींपैकी एका युवकाने घरासमोरून जात असताना घाणेरडे इशारे केले. तर जातीवाचक शब्द वापरुन लज्जा उत्पन्न होईल असे, वक्तव्य केले. त्याचा जाब विचारण्यासाठी त्याच्या वडिलांकडे गेले असता, उलट त्याच्या वडिलांनी देखील वरील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घाणेरडे इशारे करणारा सदर युवक व त्याचा भाऊ दोन्हीने येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगावरचे कपडे फाडले. या मारहाणीत सोन्याचे गंठण देखील गहाळ झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता, गुन्हा दाखल करून न घेता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. ही तक्रार मान्य नसल्याने, पोलीस प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल न झाल्याा उपोषण करण्याचा इशारा पीडित महिलेने केला आहे.