प्रेक्षणीय कुस्ती करुन आकडी डावावर प्रतिस्पर्धी मल्लास केले चितपट
नगर (प्रतिनिधी)- शहरातील वारुळाचा मारुती येथील नागपंचमीच्या यात्रेनिमित्त हिंदुत्व युवा प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे मैदान उत्साहात पार पडले. यामध्ये चितपट कुस्ती करुन विजयी झाल्याबद्दल पै. चैतन्य शेळके याला चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कुस्ती मैदानात पै. चैतन्य शेळके याची कुस्ती पै. बाळा गंडाळे यांच्यात रंगली होती. तोडीस तोड मल्ल असलेली ही कुस्ती प्रेक्षणीय ठरली. या कुस्तीमध्ये पै. शेळके याने आकडी डावावर पै. गंडाळे याला चितपट करुन विजय संपादन केले. विजय मिळवल्याबद्दल त्याचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान पार पडला. यावेळी पै. शिवाजी आप्पा वाघ, माजी नगरसेवक पै. संभाजी लोंढे, पै. मारुती खंडागळे, पै. अशोक घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक वारुळे, पै. मिलिंद जपे, पै. काका शेळके, पै. महेश लोंढे, पै. नाना डोंगरे, पै. बाळासाहेब भापकर, पै. सुनील कदम, पै. गोरख खंडागळे, पै. अनिल गुंजाळ आदी उपस्थित होते.
पै. चैतन्य शेळके हा उत्कृष्ट कुस्तीपटू असून, त्याने राज्यस्तरावर देखील पदकांची कमाई केलेली आहे. अर्जुनवीर पुरस्कार प्राप्त पै. काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे तो सराव करत आहे.