गावातून मिरवणुकीसह रंगली तिरंगा रॅली; आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांचा सहभाग
नगर (प्रतिनिधी)- भारतीय सेनेत (एएमसी) आर्मी मेडिकल कोर मध्ये 30 वर्षेच्या सेवेनंतर सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांचा सेवापूर्तीनिमित्त निंबळक (ता. नगर) येथील आजी-माजी सैनिक व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. सेवापूर्तीनिमित्त सुभेदार कोतकर यांची गावातून मिरवणुकीसह तिरंगा रॅली काढण्यात आली.
निंबळक मधील श्री साईनाथ मंदीर येथून या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला होता. देशभक्तीच्या गीतांवर निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय…., वंदे मातरम व जय जवान जय किसान…च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. मिरवणूक सार्थक लॉन्स मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आल्यानंतर फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जाजगे गुरुजी व बाळासाहेब कोतकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सतीश गेरंगे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन देशभक्तीच्या भावनेने गावातील युवक भारतीय सैन्यात सेवा देत असून, गावातील सर्व माजी सैनिक त्यांची प्रेरणा असल्याची भावना व्यक्त केली.
निंबळकचे सरपंच प्रियंकाताई लामखडे यांनी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शहीद स्मारक व त्रिदल सैनिक संघटनेच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले. जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांनी सैन्यात केलेल्या सेवेचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सैनिक सेवेनंतर गावात आल्यास त्याला वास्तविक जीवन व व्यवहाराची माहिती कमी असते. त्यांची फसवणूक व पिळवणूक होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे भावकीच्या वादात जमीन, घर, बांधावरील रस्ता यावरून अनेक प्रकारचे वाद निर्माण होतात. या संदर्भात त्यांना सहकार्य करण्याचे माजी सैनिकांनी आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात अंकुश खोटे यांनी सैनिकांच्या कठीण काळातील प्रसंगाला उजाळा दिला. त्रिदल सैनिक संघाच्या माध्यमातून माजी सैनिकांचे प्रश्न सोडविले जात असून, संघटनेची उत्कृष्ट वाटचाल सुरु आहे. सर्वांनी एकत्रित येऊन सैनिकांच्या समस्यासाठी लढा देण्यास सज्ज राहण्यास सांगितले.
सत्काराला उत्तर देताना सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांनी ग्रामस्थांच्या प्रेमातून उतराई होणे अशक्य असून, झालेल्या सन्मानाने मन भारावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाऊसाहेब विष्णू कोतकर, मेजर सुनील कोतकर, इंजि. तुकाराम वारुळे, पोखर्डीचे चेअरमन सुरेशराव वारुळे, उद्धव चव्हाण, त्रिदल सैनिक संघटनेचे (म.रा.) अध्यक्ष अंकुश खोटे, मेजर निळकंठ उल्हारे, कॅप्टन बशीर शेख, जावेद शेख, झगडे मेजर, बबन दहिफळे, नवनाथ भगत, नाना घोलप, संजय म्हस्के, मेजर एकनाथ आडसुळे, बाबासाहेब कोतकर, रावसाहेब कळमकर, मेजर दारकुंडे, शरद कातोरे, शरद पवार, लेफ्टनंट संपत निमसे, राजू कुलकर्णी, गायकवाड मेजर आदींसह आजी-माजी सैनिक, वीर माता-पत्नी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मान सोहळ्यासाठी उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन मेजर मारुती ताकपेरे व त्रिदल सैनिक संघ इसळक-निंबळकच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले होते.