युवा कौशल्य सप्ताहानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण
स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करा -दादाभाऊ गुंजाळ
नगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेत व्यवस्थापकी कमिटी सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महिला, युवती, एकल महिला आणि बचत गटातील महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तर युवा कौशल्य सप्ताहानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण पार पडले.

संस्थेचे चेअरपर्सन उषाताई गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनाचे सहाय्यक आयुक्त रवीकुमार पंतम, संचालक बाळासाहेब पवार, विजय इंगळे, काशिनाथ गुंजाळ, पूजा देशमुख, अनघा बंदिष्टी, खलील हवालदार, ज्योती पगारे, प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे, शुभदा पाठक आदी उपस्थित होते.
या बैठकीत महिला, युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यावसायिक प्रशिक्षणाचा आढावा घेण्यात आला. तर भविष्यात अधिक उत्तमप्रकारे शासनाच्या धोरणानूसार व्यावसायिक प्रशिक्षण देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उषाताई गुंजाळ, प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे व काशीनाथ गुंजाळ यांनी शहरातील विविध प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन महिला व युवतींशी संवाद साधला.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ म्हणाले की, महिलांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात केल्यास स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करुन स्वत:ला अपडेट करावे लागणार आहे. महिला व युवतींनी ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यांनी आवाहन केले.
बाळासाहेब पवार म्हणाले की, समाजातील महिला व युवतींना आत्मनिर्भर करण्याचे कार्य जन शिक्षण संस्था करत आहे.
यासाठी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम सुरु आहे. युवक-युवतींमध्ये कौशल्यक्षम शिक्षण निर्माण करून सक्षम भारत घडणार आहे. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात 40 हजार पेक्षा अधिक महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उषाताई गुंजाळ यांनी उंबरठा ओलांडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलांच्या प्रगतीची ही पहिली पायरी आहे. महिलांनी स्वत:मधील क्षमता व कला ओळखून त्याला व्यावसायिक रुप दिल्यास चांगल्या पध्दतीने त्यांची प्रगती साधली जाणार असल्याचे, ते म्हणाल्या.
युवा कौशल्य सप्ताहानिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेल्या रांगोळी, मेहंदी, निबंध, वक्तृत्व, हेअर कट, मेकअप, फॅशन डिझायनिंग आदी विविध स्पर्धेला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामधील पहिले तीन क्रमांक पटकाविलेल्या विजेत्या महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच स्वच्छता पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे, प्रशिक्षिका निलिमा बल्लाळ, ज्योती दिवटे, विजय बर्वे, उषा देठे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.