तातडीने नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी; सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा
भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील प्रभाग क्रमांक 16 मधील पाणीटंचाईचा प्रश्न उन्हाळ्यानंतर पावसाळ्यातही बिकट बनलेला असताना तातडीने नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे सुजय मोहिते यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सुजय मोहिते यांनी नुकतीच मनपा आयुक्त डांगे यांची भेट घेऊन पाण्याच्या प्रश्नावर लक्ष वेधले. प्रभाग 16 मधील नागरिक मागील सहा महिन्यापासून पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जात आहे. उन्हाळा संपल्यानंतरही पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला व प्रशासनाला सहकार्य केले, परंतु आता पावसाळ्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असताना देखील सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला. भूषणनगर, शिवाजी नगर वैष्णव नगर, शाहूनगर, अंबिका नगर, मराठा नगर आदी भागात पाणीटंचाईमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, नागरिकांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सुजय मोहिते यांनी केली आहे. तर नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असे म्हंटले आहे.