कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- रामवाडी झोपडपट्टी मधील कचरा वेचक कामगार आणि त्यांच्या मुलांसाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत आधार अपडेट शिबिचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात लहान बालकांचे आधार कार्ड काढणे, दुरुस्ती करणे, मोबाईल नंबर लिंक करणे आदी दुरुस्ती मोफत करुन देण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे यांच्या हस्ते झाले. उडानशिवे म्हणाले की, कचरा वेचक कामगार अशिक्षित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या आधार कार्डमध्ये अनेक चूका व त्रुटी आहेत. आधार अपडेटसाठी त्यांच्याकडून अनेक ठिकाणी जास्तीचे पैसे वसुल केले जातात. या कष्टकरी वर्गाला शासनाच्या कल्याणकारी इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांना योग्य सुधारित आधार कार्डची गरज भासत असते. या उद्देशाने त्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
तसेच विविध क्षेत्रातील कामगारांना नमस्ते भारत, बांधकाम महामंडळ व मोलकरीण कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत कार्यरत असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.
या शिबिराचा रामवाडी भागातील सर्व कष्टकरी, कामगार वर्गाने लाभ घेऊन आपल्या आधार मध्ये दुरुस्त्या केल्या व मोबाईल नंबर, बँक खाते आधारशी लिंक केले. शिबिरासाठी पोस्ट ऑफिसचे प्रवर अधीक्षक विकास पालवे व वरिष्ठ पोस्ट मास्तर खडकीकर यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी करण्यासाठी पोस्ट ऑफिसचे अधिकारी सुभाष बर्डे, पोस्टमन संजय परभणे, सुनील थोरात यांनी परिश्रम घेतले.