शहराच्या माळीवाडा भागातील जागा फसवणुकीने खरेदी केल्याचा आरोप
पिडीत भिंगारदिवे कुटुंबीयांचा आत्मदहन करण्याचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- शहरात माळीवाडा येथील मागासवर्गीय कुटुंबीयांची जमीन बळकवणाऱ्या भूखंड माफियावर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. येत्या आठ दिवसात संबंधितांवर गुन्हा दाखल न केल्यास पिडीत भिंगारदिवे कुटुंबीयांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
या उपोषणात रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, विवेक भिंगारदिवे, गणेश कदम, अविनाश भोसले, कृपाल भिंगारदिवे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, आरतीताई बडेकर, शिवाजी साळवे, माया जाधव, सारिका गांगुर्डे, सतीश साळवे, जयराम आंग्रे, सुनील कदम, यशराज शिंदे, रितेश क्षीरसागर, मुकेश नंदिरे, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे, अभिजीत साळवे, पप्पू क्षीरसागर, राज साळवे, सुदाम भिंगारदिवे, संग्राम साळवे, संग्राम नंदिटे, भास्कर रणनवरे, बाळू भिंगारदिवे आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बाळू मारुती भिंगारदिवे व त्यांच्या कुटुंबीयांची (रा. सावेडी) आर्थिक फसवणूक करून त्यांच्या इच्छेविरुद्ध शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माळीवाडा येथील गट नंबर 8/11 मधील 22 आर जमीन खरेदी करण्यात आलेली आहे. भिंगारदिवे कुटुंबीयांनी गट नंबर 8/11 मधील मिळकतीच्या 7-12 काही कामासाठी काढला असता, सदर मिळकत विक्री झाली असल्याचे समजले. सदर मिळकत हे बाणेर, जि. पुणे येथील केशव ढवळे व बीड येथील प्रसाद जोगदंड यांच्या नावाने सातबारा निघत आहे. या संदर्भात सबरजिस्टार कार्यालयामधून खरेदीखत काढून घेण्यात आले.
बाळू भिंगारदिवे हे मागील दहा वर्षापासून गाव सोडून निघून गेले होते. त्यांचा शोध बऱ्याच दिवसापासून सुरु होता. ते शिवाजीनगर पुणे येथे भंगार गोळा करीत असताना 10 फेब्रुवारी 2020 रोजी आढळून आले. सर्व कुटुंबीयांनी त्यांना घरी आनले व आपल्या माळीवाडा येथील मिळकत विक्री संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी ढवळे व जोगदंड यांनी ओळख निर्माण करुन पाच ते सहा महिने काही रकमा दिल्या. अंदाजे 2 लाख रुपया पर्यंत रक्कम देण्यात आलेल्या होत्या. त्यांनी दारु पाजून एका कार्यालयात घेऊन जावून स्टॅम्पवर सह्या घेतल्याचे त्यांनी घरच्यांना सांगितले.
संबंधितांनी 13 जुलै 2013 रोजी खरेदी करून घेतलेल्या खरेदीखताप्रमाणे कोणत्याही प्रकारची रक्कम देण्यात आलेली नाही. खरेदी खताप्रमाणे 24 लाख रुपये इतकी रक्कम अदा केल्याची दाखविण्यात आलेले आहे. खरेदी देणाऱ्या व्यक्तीला रोख अथवा चेक स्वरूपात कोणतेही रक्कम मिळालेली नाही. सदर खरेदीखतामध्ये आयडीबीआय शाखा कोथरूड व राजगुरू सहकारी बँकचे (शाखा शिरूर) धनादेश दिल्याचे नमुद केले आहे. मात्र सदर इसमांनी कोणतेही चेक बाळू भिंगारदिवे यांना दिलेले नाही. संबंधित बँकेत चौकशी केली असता सदर चेक आमच्या बँकेचे नसल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरुन त्यांची फसवणुक झाली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हंटले आहे.
सदर व्यक्तींनी दारु पाजून अडाणीपणाचा फायदा घेऊन बाळू भिंगारदिवे यांच्याकडून जमीनीची खरेदी घेतली आहे. याप्रकरणी खरेदीची कोणतीही रक्कम न देता फसवणुकीने स्वत:च्या नावावर जागा करुन घेणाऱ्यांवर फसवणुकीसह अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.