महिलांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात करुन स्वतःच्या पायावर उभे रहावे -रवीकुमार पंतम
महिला व युवतींनी घेतली सार्वजनिक स्वच्छतेची शपथ; विविध स्पर्धा आणि उपक्रमाचे आयोजन
नगर (प्रतिनिधी)- महिलांनी व्यावसायिक कौशल्य आत्मसात केल्यास स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे. नवीन तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करुन स्वत:ला अपडेट करण्याची गरज आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी जागतिक पातळीवरील बदल स्वीकारावे लागणार आहे. काळानुरूप बदल स्विकारुन पुढे जाण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनाचे सहाय्यक आयुक्त रवीकुमार पंतम यांनी केले.

कौशल्य विकास व उद्योजक मंत्रालय संचलित जन शिक्षण संस्थेत युवा कौशल्य सप्ताह व स्वच्छता पंधरवडाचे उद्घाटनप्रसंगी पंतम बोलत होते. यावेळी सेंटर फ्रॉम युथ डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीचे मोहन कांडेकर, जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, सौ. कमल पवार, कौशल्य विकास व उद्योजकता कार्यालयाचे अधिकारी शुभदा पाठक, वरिष्ठ लिपीक संतोष वाघ, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे, प्रशिक्षिका निलिमा बल्लाळ, ज्योती दिवटे, विजय बर्वे, उषा देठे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे पंतम म्हणाले की, भारत हा युवकांचा देश आहे. युवकांमध्ये कौशल्य विकसीत केल्यास राष्ट्राचा झपाट्याने विकास साधला जाणार आहे. एआय मुळे नोकऱ्या जाणार नसून, आणखी वाढणार आहे. उद्योजक क्षेत्राला कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी स्वत:मधील कौशल्य विकसीत करण्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, आजही समाजात पारंपारिक पध्दतीने काम सुरु आहे. त्याकामाला अद्यावत तंत्रज्ञानाची जोड देऊन नाविन्य आणून पारंपारिक व्यावसायिकांना सक्षमपणे उभे करण्याची गरज आहे. यासाठी अद्यावत कौशल्यक्षम प्रशिक्षणाची गरज आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांमध्ये कौशल्यक्षम शिक्षण निर्माण करून सक्षम भारत घडणार आहे. संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात 40 हजार पेक्षा अधिक महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले.
मोहन कांडेकर म्हणाले की, स्वच्छता स्वत:पासून सुरु करण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व दिल्यास रोगराईला अळा बसणार आहे. स्वच्छता अभियानापुरती मर्यादित न राहता, दैनंदिन जीवनाचा भाग बनण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन स्वच्छतेचे महत्त्व विशद केले.
स्वच्छता पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशिक्षणार्थी महिला व युवतींना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ देण्यात आली. जन शिक्षण संस्थेत 16 ते 21 जुलै युवा कौशल्य सप्ताह साजरा केला जात आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या स्थापनेला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेच्या माध्यमातून राज्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शहरातील मुख्य शाखेत वक्तृत्व, निबंध आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाशी निगडीत मेहंदी, हेअर कट, रांगोळी स्पर्धा, फॅशन डिझायनिंग संदर्भात स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या वतीने 16 ते 31 जुलै दरम्यान स्वच्छता पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण, श्रमदान, स्वच्छता अभियान, स्वच्छता रॅली आदी विविध उपक्रमाचा समावेश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले. आभार शफाकत सय्यद यांनी मानले.