रविवारी पत्रकारांसाठी मीडिया संमेलनाचे आयोजन
राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मीडिया विभागाचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, माऊंट आबू आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अहिल्यानगर मीडिया विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पूर्नस्थापना या विषयावर मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावेडी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय शिवदर्शन भवन, 63/40 महावीर नगर, शेवडी रोड येथे रविवार दि. 20 जुलै, सकाळी 10 ते 12 या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात सर्व पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी, डिजीटल मीडिया व पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी यांनी केले आहे.
समाजाचे दर्पण म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिते मध्ये अनेक बदल होत आहे, अनेक प्रवाह आणि नवीन आयाम पत्रकारितेमध्ये आणि माध्यमांमध्ये आले आहेत. पेन पत्रकारितेपासून पेनलेस पत्रकारितेपर्यंत पोहचलेल्या या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेतील शाश्वत मूल्य कुठे तरी लोप पावत असल्याची जाणीव होत आहे. या मूल्यांना पुनर्स्थापित करण्याची गरज निर्माण झालेली असताना या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मुख्यालय माऊंट आबू (राजस्थान) येथे आहे. सध्या भारतात आणि विश्वात 140 देशांमध्ये 8.500 पेक्षा अधिक सेवाकेंद्र मानवतेच्या नैतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी समर्पित आहेत. ही संस्था कोणत्याही जाति, धर्म, रंग-भेद, संप्रदाय, राष्ट्रीयतेच्या भेदभावापासून अलिप्त असून मानवाच्या सर्वागिण उन्नतीसाठी, समर्पित आहे. समाजासाठी असलेली पत्रकारितेचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्यात गाव, तालुका, जिल्हास्तरीय कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन मीडिया प्रभागामार्फत केले जाते. त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर शहरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या संमेलनात ब्रह्माकुमार डॉ. शांतनू भाईजी, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंटआबू (राजस्थान) आणि प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, मीडिया प्राध्यापक व महाराष्ट्र राज्य मीडिया प्रभाग समन्वयक (जळगाव) याबरोबरच या संमेलनात सहभागी ज्येष्ठ मीडिया प्रतिनिधींचेही विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व संपादक व ज्येष्ठ पत्रकार यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
या संमेलनात सहभागी झालेल्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सहभागासाठी कुठलेही नोंदणी शुल्क नसून, नोंदणी क्यूआर कोड अथवा: https://tinyurl.com/BkMahaMedia या लिंकद्वारे होऊ शकते. उपरोक्त दोन्हीला पर्याय म्हणून 9850693705 या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.