महसूल विभागाने आदेश दिल्याची भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांची माहिती
18 वर्षानंतर दंडाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे 28 जुलै 2007 रोजी साहेबराव विठोबा पवार यांच्या मालकीचा व ड्रायव्हर चंद्रकांत साहेबराव पवार यांचा ट्रॅक्टर हा विनाक्रमांकाच्या ट्रॉली मधून अवैध वाळू वाहतूक करत होता.
ही एक ब्रास अवैध वाळू वाहतुक गावचे तलाठी दगडखैर यांनी पकडली आणि वाळूसह ट्रॅक्टर प्रांत कार्यालय येथे जमा करण्याच्या सूचना दिल्या. तत्कालीन तहसीलदार भांगरे यांनी एक ब्रास अवैध वाळुसाठी 3100/- रुपये दंड केला. हा दंड पवार यांनी शासकीय खजिन्यात जमा करून एक ब्रास वाळूसाठी 3100/- रुपये दंड मान्य केला.
महसूल विभागाचे तत्कालीन तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी या अवैध वाळूचा ओघ शोधला असता चिचोंडी पाटीलच्या मेहकरी नदी मधून, गट क्रमांक 652 व 653 मधून शेकडो ब्रास वाळू उपसा झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने नजर पंचनामा केला असता 300 ब्रास वाळू उपसा झाल्याचे त्यांना लक्षात आले. या 300 ब्रास वाळूसाठी 3 लाख रुपये दंड नगर तहसीलदार यांनी ठोठावला.
पुढे प्रत्यक्ष तंतोतंत मोजमापे घेतली असता 511 ब्रास वाळू उपसा झाल्याचे महसुल विभागाच्या निदर्शनास आले. सदर 511 ब्रास अवैध वाळूसाठी 3100 रू. ब्रास प्रमाणे 15 लाख 84 हजार रुपये दंड आकारण्याची मागणी करण्यात आली. मात्र पवार यांनी 3 लाख रुपये दंड मान्य नसल्याने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. त्यांनी अपिल फेटाळून दंड कायम केला. पवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेले अपीलही फेटाळले गेले. त्यानंतर पवार यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल करून तदनंतर न्यायालयातही या प्रकरणी दाद मागण्यात आली. अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये या प्रकरणी एकूण 88 तारखा पडल्या.
आता पुन्हा या प्रकरणी तहसीलदार यांनी पवार यांना सदरचा दंड भरण्याचे आदेश दिले. परंतु पवार यांनी दंडाची रक्कम भरली नसल्यामुळे सक्तीने वसुली करण्यासाठी पवार यांच्या शेती गटांवर 3 लाख रुपयांचा बोजा चढवण्याचे आदेश नगर तहसीलदार यांनी पारित केले आहेत.
वाळू धाडीतील पंचनाम्यावर स्वाक्षरी केल्याबद्दल चिचोंडी पाटील येथील युवा नेते अशोक रामदास कोकाटे आणि दिलीप रामभाऊ कोकाटे यांना 18 वर्षांपूर्वी पवार यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. कोकाटे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला संबंधितां विरुद्ध अर्ज दिल्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनने पवार यांना तंबी देऊन कारवाईचे आदेश दिले होते. सदर प्रकरणी तीन लाख रुपये दंड वसुलीचे आदेश झाले आहेत. मात्र एकूण 511 ब्रास वाळू उपसा केल्याबद्दल 15 लाख 84 हजार रुपये दंड त्यावेळी होत होता. तो दंड 18 वर्षानंतर वाढवला गेला पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी म्हंटले आहे.