बाल वारकऱ्यांच्या दिंडीचे उत्साहात स्वागत
विठ्ठल नामाच्या जय घोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझिम व ढोल पथकासह रंगला सोहळा
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भक्तीमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा…, माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन विठ्ठल नामाच्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझिम व ढोल पथकासह दिंडी सोहळा रंगला होता.
शालेय संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते यांनी शाळेत राबविण्यात आलेल्या दिंडीचे कौतुक करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक संतोष सुसे, लता म्हस्के, सविता सोनवणे, राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, भाऊसाहेब पुंड, सचिन बर्डे, अमोल मेहत्रे, सारिका गायकवाड, निता जावळे, सविता सोनवणे, मिनाक्षी घोलप आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी पारंपारिक वाद्याच्या गजरात लेझिमचे डाव सादर केले. दिंडीत विद्यार्थी वारकरींच्या वेशभूषेत तर विद्यार्थिनी डोक्यावर तुलस वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ, मृदूंग व वीणा हातात घेऊन बाल वारकऱ्यांनी केलेल्या विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, जिजाऊ, श्रीकृष्ण, मीराबाई, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले.
शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पहाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.