टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथील नेप्ती विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन गावातून दिंडी काढण्यात आली, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जय घोषात, पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत विद्यार्थी उत्स्फुर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते. तर मुली तुलसी वृंदावन घेऊन उपस्थित होत्या. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी आणि विविध संत-महापुरुषांच्या वेशभूषेत असलेल्या चिमुकल्यांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून पालखीची पूजा केली.
या दिंडीमुळे गावातील वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी मुख्याध्यापक महेश जाधव, राजेंद्र झावरे, रामदास फुले, नानासाहेब घोडके, बाबा भोर, गोरक्षनाथ कोतकर, राधिका वामन, श्रद्धा भांड, बाबुलाल सय्यद, शिवाजी जाधव, संतोष खरमाळे शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.